आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- रसिक औरंगाबादकरांसाठी यंदा जिल्हाधिकारी कार्यालयातून आनंदित करणारी बातमी आहे. गतवर्षी मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट असल्याने देशभरात प्रसिद्ध झालेला वेरूळ महोत्सव होऊ शकला नव्हता. मात्र, यंदा हे सावट दूर झाल्याने जिल्हा प्रशासन महोत्सवाच्या तयारीला लागले आहे. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी संबंधितांसोबत दोन बैठकांमध्ये चर्चा केली असून लवकरच या महोत्सवाची तारीख जाहीर केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
वेरूळ महोत्सव म्हटले की स्थानिक कलावंत कमालीचे खुश होतात. काहींना कला सादर करण्याची संधी मिळते तर उर्वरित जण राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलावंतांच्या कलेचा आस्वाद घेऊ शकतात. गतवर्षी पाणीटंचाईचे सावट असल्याने प्रशासनाने तो रद्द केला होता. यंदाही तो होईल की नाही, यावर तर्क-वितर्क सुरू होते. जून महिन्यात चांगला पाऊस झाला असला तरी पुरेसा पाणीसाठा नसल्याने यंदाही टंचाईचे सावट होते. त्यामुळे वेरूळ महोत्सवावर फारशी चर्चा झाली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे पुढील उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे ढग दूर झाले. यंदाचा महोत्सव केव्हा घ्यायचा, त्यात कोण कलाकार असतील, याची रूपरेषा लवकरच तयार करण्यात येणार असून त्याबाबतची अधिकृत घोषणाही लवकरच केली जाण्याची शक्यता आहे.
2009 पासून लागले ग्रहण
कमालीच्या लोकप्रिय झालेल्या या महोत्सवाला 2009 पासून ग्रहण लागले होते. महोत्सव जाहीर होऊन तयारीही अंतिम टप्प्यात असताना मुंबईवर बॉम्बहल्ला झाल्याने तो ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. पुढील वर्षी तो होऊ शकला नाही. 2011 मध्ये तो झाला. मात्र, त्यानंतर दुष्काळामुळे 2012 मध्ये पुन्हा स्थगित करावा लागला. यंदा मात्र तो होणार आहे.
पालिकेबरोबरच स्थानिक संस्था-संघटनांकडून मदत घेणार
महोत्सवासाठी स्थानिक संस्था, संघटनांकडून निधी उभा केला जातो. यंदा महानगरपालिका, उद्योजक, तसेच बांधकाम व्यावसायिकांकडून मदत घेतली जाणार असून त्यासाठी दोन बैठका झाल्या आहेत.
यंदा महोत्सव नक्की
प्रसिद्ध वेरूळ महोत्सव यंदा घेतला जाणार हे नक्की झाले आहे. त्यासाठी आतापर्यंत दोन बैठका झाल्या असून लवकरच तारीख व अन्य बाबी जाहीर केल्या जातील.
-विक्रमकुमार, जिल्हाधिकारी.
वैयक्तिक पातळीवर मदत
या महोत्सवासाठी संघटना म्हणून नव्हे तर वैयक्तिक पातळीवर मदत केली जाते. महोत्सवामुळे औरंगाबादची प्रतिमा उंचावत असल्यामुळे यास व्यक्तिश: मदत केली जाईल. हा महोत्सव औरंगाबादची शान आहे, तो झालाच पाहिजे.
-पापालाल गोयल, अध्यक्ष, क्रेडाई.
म्हैसमाळसाठी स्वतंत्र प्राधिकरणाची मागणी
पर्यटक शहरातील पर्यटनस्थळे आणि दौलताबाद किल्ला, शूलिभंजन, म्हैसमाळ, वेरूळ, अजिंठा लेणी या स्थळांना भेटी देतात. मात्र, येथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. हे चित्र बदलण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची गरज आहे. त्यामुळे तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला. परंतु याचा पाठपुरावा करण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी पुढे येत नसल्याने हा प्रस्ताव धूळ खात पडून आहे. हे प्राधिकरण कधी होईल याची शाश्वती नसल्याने गंगापूर-खुलताबादचे आमदार बंब यांनी म्हैसमाळ, वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर, खुलताबाद, शूलिभंजन या डोंगरदर्यांसाठी स्वतंत्र प्राधिकरणाची मागणी केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.