आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Education Minister Rajendra Darda

खुद्द शिक्षणमंत्र्यांच्या शहरात बालभारतीला मिळेना जागा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दस्तुरखुद्द शालेय शिक्षणमंत्र्यांच्या शहरात म्हणजे औरंगाबादेत बालभारतीची नवी इमारत बांधण्यासाठी सरकार जागा देत नसल्याचे धक्कादायक वृत्त आहे. बालभारतीचे अध्यक्ष असूनही शिक्षणमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने पाठ्यपुस्तक महामंडळाला भाड्याने जागा घेऊन तेथे पुस्तके ठेवावी लागत आहेत. रेल्वेस्टेशन एमआयडीसीतील दै. तरुण भारत कार्यालयाचे गोडाऊन बालभारतीने भाड्याने घेतले.

रेल्वेस्टेशन एमआयडीसीत राज्य पाठ्यपुस्तक महामंडळ (बालभारती) डेपो आहे. गेल्या 29 वर्षांत येथील पुस्तकांचा बोजा वाढतोच आहे. या लाखो पुस्तकांचा साठा ठेवण्यासाठी जागा कमी पडते. शिवाय सरकारकडून छपाईच्या कागदाचे रोल येत असतात. त्यामुळे नव्या इमारतीच्या बांधकामासाठी येथील अधिकार्‍यांनी शासन व शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवले. एमआयडीसीकडे जागेसाठी अर्ज केला. पण एमआयडीसीचे अधिकारी ओपन टेंडरमध्ये अर्ज करायला सांगतात आणि आम्ही 1250 रु .चौ.मी.पेक्षा जास्त दराने टेंडर भरू शकत नाही, असे अधिकारी म्हणतात. ही बाबही शासनाला कळवली आहे. भविष्याचा विचार करता किमान पाच एकर जागा हवी असल्याचे अधिकारी म्हणतात.

जळगावसह मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांचा कारभार येथून चालतो. 1985 पासून एक एकर जागेत विस्तारीकरण करत आणखी तीन इमारती उभारल्या गेल्या. परंतु जागा कमीच पडते आहे. दोन वर्षांपासून शिक्षण मंत्र्यांकडे आम्ही हा विषय पाठवला आहे, असे येथील अधिकार्‍यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. शिवाय पावसाळ्यात डेपोला धोका असतो. अनेकवेळा पाणी शिरल्याने बरेच नुकसानही झाले आहे. एमआयडीसीकडून जागेसाठी टोलवले जात आहे. आमचे महामंडळ असले तरी शासनाचेच आहे. पण याबाबत कोणीही गंभीर नसल्याचेही अधिकार्‍यांनी म्हटले आहे.
माझा पाठपुरावा सुरू आहे
बालभारतीला जागा कमी पडत असल्याचे माहिती आहे. मी पाठपुरावा करत आहे. एमआयडीसीच्या अधिकार्‍यांशीही बोललो आहे. त्यांच्या सीईओंशीही बोललो. औरंगाबादच्या डेपोसाठी जागा मागितली आहे. कोल्हापुरात जागा मिळाली आहे. औरंगाबादेतही मिळेल.
राजेंद्र दर्डा, शालेय शिक्षणमंत्री

18 कोटी रुपयांची पुस्तके राज्यातील सर्व डेपोंत छापली जातात.
1.5 कोटींची पहिली ते बारावीपर्यंत पुस्तके औरंगाबादेत छापतात.