Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Latur, Parbhani And Chandrapur Election Result Analysis

Expert Comment: परंपरागत राजकारणाला नाकारले; काँग्रेसच्या पराभवाची तर भाजपच्या विजयाची कारणे

सचिन काटे | Apr 21, 2017, 15:52 PM IST

  • लातूर, चंद्रपुरात भाजप तर परभणीत कॉंग्रेस सत्ता स्थापनेकडे वाटचाल करत आहे.
लातूर, चंद्रपूर आणि परभणी महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागत आहेत लातूर, चंद्रपुरात भाजप तर परभणीत कॉंग्रेस सत्ता स्थापनेकडे वाटचाल करत आहे. भाजपने दोन्ही ठिकाणी कॉंग्रेस कडून सत्ता हिसकावून घेतली आहे. तर परभणीत कॉंग्रेसने राष्ट्रवादीला मोठा हादरा दिला आहे.
#आमदार अमित देशमुख यांचा कार्यकर्त्यांसोबत तुटत चाललेला संपर्क
माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचा गड असलेल्या लातूर मध्ये त्यांच्या शिवाय होत असलेल्या महापालिका निवडणुकीत त्यांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. जिल्हा परिषद पंचायत समितीत हादरा बसल्यानंतर पालिका ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले पण मतदारांनी त्यांना साफ नाकारल्याचे निकालाने स्पष्ट झाले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावर कॉंग्रेस नेतृत्वाने पाळलेले मौन तसेच कार्यकर्त्यांशी तुटत गेलेला संपर्क, ‌उपलब्धतेचा अभाव, नवाबी थाटाची वर्तणूक, आणि लोकांना गृहित धरण्याचा अति आत्मविश्वास हे कॉग्रेसच्या पराभवाची मुख्य कारणे मानण्यात येत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे स्थानिक सत्तेत काहीच अस्तित्व नसतानाही देशात आणि राज्यात सुरू असलेली वाटचाल, पाण्यासारखी गंभीर समस्या सोडवण्यासाठी घेतलेला पुढाकार, संभाजी पाटील निलंगेकर यांच्या रूपात भाजपला दिलेले लोकांत मिसळणारे नेतृत्व, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेले विकासाचे आश्वासन यामुळे लातूर महापालिका ताब्यात घेण्याचा भाजपचा मार्ग सुकर झाला.
# चंद्रपूरमध्ये विकासाचा अजेंडा, कार्यकर्त्यांची फळी कामी आली
चंद्रपूर महापालिकाही कॉग्रेसच्या ताब्यात होती. कॉंग्रेसचे वजनदार नेते असलेले नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वातील पालिका जिंकण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. गटा-तटामुळे कॉंग्रेसला बहुतांश ठिकाणी दगाफटका होतो. हा धोका ओळखून या वेळी कॉंग्रेसने पुगलिया आणि वडेट्टीवर यांच्यातील अंतर्गत वाद शमवला होता. तेव्हा चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत मुनगंटीवार यांनी एकहाती सत्ता मि‌‌‌ळवत वर्चस्व सिध्द केले आहे. राज्यात आणि मतदार संघात सुरू असलेला विकासकामांचा धडाका आणि भविष्यातील विकासाचे नियोजन पाहून जनतेने भाजपच्या पारड्यात सत्ता टाकली आहे. निवडणुकीचे योग्य नियोजन, कार्यकर्त्यांची फळी, विकासाचा अजेंडा, लोकांचे मोठे समर्थन असतानाही येथे कॉंग्रेसने मिळवलेले यश दुर्लक्षीत करता येणार नाही.

परभणी महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व राहीले आहे. लोकसभा, विधानसभा आपल्या वर्चस्वाखाली ठेवणाऱ्या शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थेत कधीच यश आले नाही. या ठिकाणी एकही आमदार नसताना कॉंग्रेसने राष्ट्रवादीच्या हातून सत्ता खेचून आणली आहे. शिवसेनेने आपला ७ नगरसेवकांचा आकडा कायम राखला आहे. तर या सगळ्या लाटेत भाजपच्या जागा वाढल्या आहेत.
#स्थानिक पक्षांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह
या तीनही महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि अन्य पक्षांना अत्यल्प जागांवर समाधान मानावे लागले आहे. स्थानिक पक्षांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे निकाल आहेत. परभणीमध्ये कॉंग्रेस विरुध्द राष्ट्रवादी तर चंद्रपूर, लातुरात कॉंग्रेस विरुध्द भाजप अशी थेट लढत झाली इतर पक्षांना मतदारांनी महत्त्व दिल्याचे दिसत नाही केंद्र आणि राज्य सरकारची वाटचाल विकासाचा अजेंडा या सोबतच कार्यकर्त्यांची समर्थ फळी, निवडणुकांचे योग्य नियोजन, सत्ताप्राप्तीच्या एकाच ध्येयासाठी बाजुला ठेवलेले गटा तटाचे राजकारण नियोजनबध्दपणे मतदारांशी साधला जाणारा संवाद या व्यवस्थापनामुळे भाजपचे विजय सुकर होत आहेत. या उलट चित्र इतर पक्षांत दिसून येते अजुनही हे पक्ष परंपरागत राजकारणावर भर देत आहेत. आणि मतदार आता परंपरागत राजकारण नाकारत आहेत हेच या निकालांनी समोर येत आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा काय म्हणतात Expert

Next Article

Recommended