आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्‍ये एलबीटी विरुद्ध युनिटी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्यातील इतर शहरांच्या एलबीटीविरोधी आंदोलनाला पाठिंबा म्हणून जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने मंगळवारी (14 मे) शहरात पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व प्रकारच्या व्यापार्‍यांनी ‘बंद’मध्ये सहभागी होत एलबीटीविरुद्ध युनिटी दाखवून दिली. ‘बंद’ 100 टक्के यशस्वी झाल्याचा आणि 15 ते 20 कोटींचा व्यवहार ठप्प झाल्याचा अंदाज व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आदेशपालसिंग छाबडा यांनी व्यक्त केला. दरम्यान, नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून पेट्रोल पंपचालकांनी बंदमधून ऐनवेळी माघार घेतली.


रेल्वेस्टेशन ते सिटी चौक, जवाहर कॉलनी, गारखेडा, पुंडलिकनगर, बाबा पेट्रोलपंप ते चिकलठाणा, सिडको-हडको, सर्मथनगर ते औरंगपुरा, गुलमंडी ते मोंढा, शहागंज, चेलीपुरा, मछली खडक आदी भागातील व्यापार्‍यांनी मंगळवारी सकाळपासूनच आपले व्यवहार बंद ठेवले होते. यामध्ये प्रोझोन मॉल, इझी डे आदी मॉल, वामन हरी पेठे, लालचंद मंगलदास सोनी, त्रिभुवनदास झवेरी आदी दागिन्यांच्या पेढी, तसेच ऑटोमोबाइल्स, वाहन विक्रीची दालने बंद होती. सर्व प्रकारच्या व्यापार्‍यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून महासंघाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. किरकोळ दुकाने वगळता शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने ‘बंद’मध्ये सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले. या संदर्भात महासंघाचे प्रवक्ते राजन हौजवाला यांनी ‘बंद’ शंभर टक्के यशस्वी झाल्याचे दै. ‘दिव्य मराठी’ला सांगितले. महाराष्ट्रातील इतर शहरातील व्यापार्‍यांच्या एलबीटीविरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मुंबईत गेल्या आठवड्यात व्यापार्‍यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी ‘बंद’ पुकारल्याचे त्यांनी सांगितले. महासंघाची एलबीटीविरोधी लढाई पूर्वीप्रमाणेच सुरू राहील; परंतु शहरवासीयांना किंवा महापालिकेला वेठीस न धरता लोकशाही पद्धतीने शासनाकडे मागणीसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. येणार्‍या वस्तू व सेवा करात इतर सर्व कर समाविष्ट केले जावेत आणि राज्यात समान कर प्रणाली असावी, या मागणीसाठी महासंघ सातत्याने पुढाकार घेणार आहे, असेही हौजवाला यांनी सांगितले.


महासंघाचे उपाध्यक्ष अजय शहा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बंद’ यशस्वी झाला आणि त्यासाठी झोएब येवलावाला, मदनभाई जालनावाला, गोपालभाई पटेल, संजय कांकरिया, राजकुमार जैन, मंगल पटेल, गोपाल पटेल, तनसुख झांबड, हरिसिंग, दीपक पहाडे, प्रवीण कुलकर्णी, नीरज पाटणी, गुलाम हक्कानी, अतुल पाटील, नंदू केलानी, संजय पटेल, दत्ता सावंत, किशोर सेठिया, अतिष सवईवाला आदी सहकार्‍यांनी पुढाकार घेतल्याचे महासंघाने कळवले आहे.


रस्त्यांवर शुकशुकाट
ऐन लग्नसराईत कापड, सोने खरेदीचा खोळंबा; वर्‍हाडींची कोंडी
सराफा बाजारात दररोज ग्राहकांची मोठी गर्दी असते.

संभ्रम दूर होणे आवश्यक
‘बंद’मुळे किमान 15 ते 20 कोटींचे व्यवहार थंडावले. महासंघाचा कोणालाही त्रास देण्याचा हेतू नव्हता आणि नाही. मात्र, महाराष्ट्रातील करप्रणालीतील संभ्रमावस्था दूर होणे आवश्यक आहे. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही समकरप्रणाली आवश्यक असून ती सर्वांसाठीच उपयुक्त ठरेल, असे जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आदेशपालसिंग छाबडा म्हणाले.

पेट्रोल पंप सुरळीत सुरू
दुपारी दोनपर्यंत पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवला नसल्याने आणि वाहनधारकांना होणारा त्रास टाळण्यासाठी पेट्रोल पंपचालकांनी ऐनवेळी बंदमधून माघार घेतली. मागील आठवड्यात संपामुळे वाहनधारकांचे हाल झाले होते. पुन्हा पंप बंद ठेवल्यास जनक्षोभ आणि कारवाईची भीती असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

व्यापार्‍यांनी बंद पुकारल्यामुळे एरवी गजबलेल्या निराला बाजार, औरंगपुरा, गुलमंडी, कासारी बाजार, टी.व्ही. सेंटर, चिकलठाणा, सिडको-हडको या भागातील रस्त्यांवर शुकशुकाट होता. लग्नसराई सुरू असल्याने सोने आणि कपडे खरेदीसाठी सिटी चौक ते शहागंज आणि मछली खडक ते रिगल टॉकीजपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाय ठेवण्यासही जागा नसते. परंतु, बंदमुळे आज येथील रस्ते निर्मनुष्य होते.