आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टँकरच्या पाण्यावर नेत्यांचा डल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भीषण पाणीटंचाईचा सामना करत असलेल्या भागांमध्ये पालिका टँकरद्वारे पाणी पुरवते. मात्र, हे पाणी राजकीय पुढारी आपापल्या भागात वळवत असल्याच्या आणि या टँकरच्या कोणत्याही नोंदी नसल्याच्या तक्रारी डीबी स्टारकडे आल्या. त्यानंतर चमूने कोटला कॉलनीतील जलकुंभावर 12 आणि 13 तारखेला स्टिंग ऑपरेशन केले. त्या वेळी भाजप, मनसे या पक्षांच्या नेत्यांनी घुसखोरी केल्याचे उघड झाले. जनहितासाठी पाणी नेत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, श्रेय घेण्यासाठी अशा प्रकारे प्रत्येक नेता व अधिकार्‍याने मनमानी केली आणि दबाव आणला तर नियमानुसार गरजूंपर्यंत पाणी पोहोचणार कसे हा खरा प्रश्न आहे. अशा प्रकारे पाणी नेण्यात सर्वच पक्षांचा वाटा असल्याचे दबक्या आवाजात कर्मचारी सांगतात. या प्रकाराचा पर्दाफाश करणारी ही प्रातिनिधिक उदाहरणे.


सांगितले पडेगाव आणि नेले पदमपुर्‍यात : वेळ 4.00
कोटला कॉलनीत पालिकेचा जलकुंभ आहे. दोन दिवसांआड या जलकुंभातून पाणी भरून एक टँकर जाते आणि पदमपुर्‍यातील अहिल्याबाई होळकर स्मारकाच्या हौदात ते पाणी सोडले जाते. एमएच 20- डब्ल्यू 6453 या क्रमांकाचे 10 हजार लिटर क्षमता असलेल्या टँकरने मंगळवारी दुपारी 4 वाजता जलकुंभातून पाणी भरले. चालक बनसोडे यांनी टँकर पडेगावला जाणार असल्याचे सांगितले. चमूने त्याचा पाठलाग केला तेव्हा ते कोटला कॉलनीतून वळण घेत क्रांती चौक मार्गे रेल्वेस्टेशन मार्गावर गेले. पुढे हे टँकर अहिल्याबाई होळकर स्मारकाच्या हौदात रिकामे करण्यात आले. चमूने त्यानंतर टँकरचालक बनसोडे यांना हेच आहे का पडेगाव? असा प्रश्न केला. तेव्हा त्यांनी ‘काय करणार, साहेब जिकडे सांगतात तिकडे जावे लागते’, असे उत्तर दिले. आयुक्तांच्या आदेशानुसार उद्यानांसाठी पिण्याचे पाणी वापरता येत नाही. सिद्धार्थ उद्यानातील विहिरीतून पाणी देण्याचे सक्त आदेश आहेत. मात्र, पालिकेच्या अधिकार्‍यांनी नियम मोडल्याचे दिसते. मात्र, हे टँकर आपल्या विभागाचे नसल्याचे उद्यान अधीक्षकांचे म्हणणे आहे.


भाजप नेत्याच्या टँकरची घुसखोरी : वेळ : 4.30
यानंतर पुन्हा त्याच जलकुंभावर दुपारी साडेचार वाजता एमएच 20- सीटी 5327 या क्रमांकाच्या टँकरने पालिकेच्या दोन टँकरमध्ये घुसखोरी केली. त्यावर भाजप शहर चिटणीस कचरू घोडके यांच्या नावाचे बॅनर होते. पाणी भरत असतानाच चमूने ही घुसखोरी कॅमेर्‍यात कैद केली. त्यावर टँकरचालकाने हे भाऊंचे टँकर असल्याचे सांगितले. डीबी स्टार चमू असल्याचे कळल्यावर त्याने फोटो न काढण्याची विनंती केली. हे टँकर दिवसातून साधारण सात- आठ वेळा या जलकुंभातून पाणी भरते. पण हे पाणी कुठे व कुणासाठी जाते याची माहिती लाइनमन डी. एन. बनकर यांनाही देता आली नाही. पालिकेच्या रजिस्टरवर याची नोंदच केली जात नाही.


मनसेची मनमानी : वेळ 5.00
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुभाष पाटील यांच्यातर्फे मोफत पाणी वाटप, मराठवाडा औद्योगिक व जनरल कामगार संघटना असे बॅनर असलेले टँकर पाणी भरताना दिसले. धक्कादायक बाब म्हणजे या टँकरला नंबर प्लेटच नव्हती. पालिकेच्या कर्मचार्‍याने सुभाष पाटील यांचे चिरंजीव किशोर पाटील यांना घाई करण्याचा इशारा केला. या इशार्‍याला न जुमानता पाटील यांनी हे पाणी जाधववाडी भागात नेत असल्याचे उत्तर दिले. चमूने पाठलाग केला असता हे टँकर थेट पिसादेवी ग्रामपंचायत हद्दीतील दत्तनगरात वितरित करण्यात आले.


नेत्यांची नेहमीची फोनाफोनी
कोटला कॉलनी जलकुंभातून अ ते ड वॉर्डात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यात पडेगाव, हसरूल, मिटमिटा या परिसरातील ड्रम योजनेत पाणी वाटप करण्याचे आदेश आहेत, पण काही राजकीय पुढारी अधिकार्‍यांवर दबाव आणतात आणि अधिकारी कर्मचार्‍यांना आदेश देतात. या साखळीमुळे ज्यांना पाणी मिळायला हवे त्यांच्या हक्काचे पाणी बॅनरबाजी करत श्रे य लाटणारे नेते पळवत असल्याचे डीबी स्टारच्या स्टिंगमध्ये उघड झाले आहे.
ते आमचे टँकर नाही.
पिण्यायोग्य पाणी उद्यानात न वापरण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश सक्त आदेश आहेत. आम्ही या आदेशाचे पालन करतो. ज्या टँकरने तेथे पाणी टाकले ते आमचे नाहीच. या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही.
विजय पाटील,उद्यान अधीक्षक
रंगरंगोटीमुळे नंबर प्लेट मिटली
आमच्या वाहनाची नवीन दुरुस्ती केली आहे. रंगरंगोटीमुळे नंबर प्लेट नाही. शहरातील कानाकोपर्‍यातून कुठूनही फोन आला तरी आम्ही पाणी देणार. गारखेडा, पेठेनगर, नंदनवन कॉलनी या परिसरात आम्ही मोफत पाणी देणार.
किशोर पाटील
आम्ही पैसे देऊन टँकर घेऊ
आम्ही लोकांना पाणी फुकट देतो. जर पालिकेने आम्हाला पैसे भरायला लावले तर आम्ही तेही करू. कुठूनही फ ोन आले तरी आम्ही त्या भागातील गरजवंतांना पाणी देणार. 30 टक्के समाजकारण 70 टक्के राजकारण हा आमचा निर्धार आहे, पण त्या माध्यमातून आम्ही जनतेची सेवा करत आहोत.
कचरू घोडके, शहर चिटणीस, भाजप
यापुढे चूक होणार नाही..
राजकीय पक्षांचे बॅनर असेलेले, नंबर प्लेट नसलेले टँकर पाणी भरत आहेत. मुळात त्यांना पालिकेच्या हद्दीबाहेर पाणी देताच येत नाही. किशोर पाटील यांनी विनंती केली होती, पण त्यांनी जाधववाडीचे नाव सांगितले होते व टँकरचा नंबरही नोंद केला होता. नोंदीत त्यांनी जाधववाडी लिहिले आहे. दिशाभूल केली असेल तर पाणी तत्काळ बंद करणार.
आर. एस. संधा, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा
थेट सवाल
हेमंत कोल्हे
कार्यकारी अभियंता, मनपा
*जलकुंभातून थेट पाणी अहिल्याबाई होळकर स्मारकात जाते.
नाही, असे होऊच शकत नाही. पिण्याचे पाणी उद्यानासाठी देण्याला आयुक्तांनीच बंदी घातली आहे.
*आमच्याकडे याचे पुरावे आहेत.
तसे असेल तर आम्ही तत्काळ कारवाई करू.
*काय कारवाई करणार?
उद्यानाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी 45 विहिरींवर विद्युतपंप आहेत. या स्मारकासाठी सिद्धार्थ उद्यानातून पाणी वाटप करण्याचे लेखी आदेश दिले आहेत.
*तरी हा प्रकार का घडतो..
उद्यान विभागाचे टँकर खराब झाले असेल, म्हणून त्यांनी वापर केला असावा.
*तीन महिन्यांपासून हा प्रकार चालू आहे.
असे असेल तर ताबडतोब कारवाई करतो.