आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leader Of The Opposition Of Aurangabad Municipal Corporation Is Muslim

एमआयएमच्या धास्तीने मुस्लिम विरोधी पक्षनेता, कॉंग्रेसने खेळली वेगळी चाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी पाठ फिरवल्याने भुईसपाट झालेल्या काँग्रेसने एमआयएमच्या धास्तीने शेवटच्या दोन महिन्यांसाठी का होईना पण मुस्लिम विरोधी पक्षनेता देण्याची चाल खेळली आहे. नगरसेवक असद पटेल यांच्या नावाची शिफारस करणारे पत्र आज महापौर कला ओझा यांच्याकडे देण्यात आले असून सायंकाळी महापौरांनी या नियुक्तीला मान्यता देणारे पत्र सुपूर्द केले.

महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपद हा संगीत खुर्चीचा खेळ बनला आहे. दर सहा महिन्यांनी विरोधी पक्षनेता बदलण्याची नवीन पद्धत काँग्रेसने या महापालिकेच्या कार्यकाळात अवलंबली आहे. डॉ. जफर खान यांच्या काहीशा लांबलेल्या नियुक्तीनंतर आशा मोरे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यांना निवडीचे पत्र देतानाच प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ही निवड सहा महिन्यांची असेल त्यानंतरच्या सहा महिन्यांसाठी रावसाहेब गायकवाड यांची निवड केली जाईल, असे जाहीर केले होते. मोरे यांचा कालावधी संपताच रावसाहेब गायकवाड विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झाले. या मनपाचा कार्यकाळ संपेपर्यंत ते या पदावर राहतील, असे आडाखे बांधले जात होते; पण विधानसभा निवडणुकीने त्याला सुरुंग लागला.
शहरातील जवळपास सगळी मुस्लिम व्होटबँक विधानसभा निवडणुकीत एमआयएमने पळवली. परिणामी काँग्रेस तिन्ही मतदारसंघांत भुईसपाट झाली. मुस्लिमांच्या या नाराजीमुळे काँग्रेसचे तोंड पोळले असून आता आगामी महापालिकेला निवडणुकीच्या तोंडावर हालचाली करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यातूनच शेवटच्या दोन महिन्यांसाठी असद पटेल यांना विरोधी पक्षनेता करण्याचा निर्णय घेण्यात आला. रावसाहेब गायकवाड यांना मुदतवाढ देण्याऐवजी असद पटेल यांची नियुक्ती करण्याबाबत आज काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवकांनी महापौर कला ओझा यांच्याकडे पत्र सुपूर्द केले. महापौरांनी सायंकाळी असद पटेल यांना नियुक्तीच्या मंजुरीचे पत्र दिले. या वेळी माजी विरोधी पक्षनेता डॉ. जफर खान, अॅड. सय्यद अक्रम, काशीनाथ कोकाटे, अफसर खान, उपमहापौर संजय जोशी यांची उपस्थिती होती.