आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: कोमेजलेली रोपे जगतील का? सरपंचांना वृक्षारोपणाची धास्ती, दर्जाहीन रोपट्यांचा पुरवठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- तालुक्यात १३५ ग्रामपंचायतींचा परिसर हिरवागार करण्यासाठी येत्या १ जुलै ते ७ जुलै या सप्ताहात ५० हजार विविध बहुपयोगी वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी येथील वन परिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) विभागाकडून ग्रामपंचायतींना दर्जाहीन रोपांचा पुरवठा करण्यात आल्यामुळे वृक्ष लागवड मोहिमेचे भवितव्य या सुमार दर्जाच्या रोपांमुळे   अडचणीच्या फेऱ्यात सापडले आहे. अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी वृक्ष लागवडीसाठी वन विभागाने उपलब्ध करून दिलेली विविध वृक्षांची रोपे दर्जेदार प्रतवारीची नसल्याचे नाराजी स्पष्टपणाने व्यक्त करत या रोपांचे संवर्धन करणे अत्यंत जिकिरीचे ठरणार असल्याचे सांगितले. 

वन विभागाकडून राज्यभरात ४ कोटी वृक्ष लागवड संकल्पनेतून येथील १३५ ग्रामपंचायतींच्या परिसरात प्रत्येकी ३६५ विविध जातींची झाडे लावण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम येत्या १ जुलै ते ७ जुलैदरम्यान राबवण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी वन विभागाने कन्नड तालुक्यातील अंबाडी, मक्रणपूर येथील रोपवाटिकेतून विविध जातींची पुरवठा केलेली वृक्षांची रोपे अत्यंत सुमार दर्जाची असल्याने लागवडीनंतर रोपे जगतील का, अशी शंका सरपंचांनी व्यक्त 
केली आहे.

वृक्ष जगतील का? सरपंचांची शंका    
गावात लोकसहभागातून स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी वृक्ष लागवड मोहिमेची तयारी केली आहे. मात्र, वन विभागाने लागवडीसाठी बाळसेदार रोपे न पुरवता मरतुकडी रोपे माथी मारण्याच्या धोरणामुळे मोहिमेचा फज्जा उडण्याची भीती लोणी बुद्रुकचे सरपंच गणेश पा. इंगळे यांनी व्यक्त केली.  

दर्जाहीन रोपांचा पुरवठा   
तालुक्यातील १३५ ग्रामपंचायतींनी वन परिक्षेत्र प्रादेशिक विभागाने कन्नड तालुक्यातील दोन रोपवाटिकांतून वृक्ष लागवडीसाठी आणलेली ५० हजार रोपे अतिशय कोमेजलेली आहेत. बुधवारी शहरातील एका परवानाधारक आरा मशीन केंद्राच्या आवारात वाटपासाठी आलेली रोपे पाहून सरपंचांनी नाराजी व्यक्त केली.  

रोपवाटिकेतून मिळालेली रोपेच देणार  
विभागाचे अधिकारी मनोज कापुरे यांच्याकडे सुमार प्रतवारीची रोपे लागवडीस उपलब्ध झाल्याची माहिती घेतली असता त्यांनी कन्नड येथील २ रोपवाटिकांतून सदरील रोपे ग्रामपंचायतींना वाटपासाठी दिली. त्यांच्याकडून जसे उपलब्ध झाली तशी रोपे वाटपासाठी उपलब्ध करून दिली. पुढील वर्षी आम्ही स्वत:च्या रोपवाटिकेत रोपे तयार करून वाटप करू, असे ते म्हणाले.   

अनेक कार्यालयांकडून मागणीच नाही   
तालुकास्तरावर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था अशा सरकारी कार्यालयांनी त्यांच्याकडून ४ कोटी वृक्ष लागवडीत किती वृक्ष लागवड करणार यांची मागणी वन विभागाकडे नोंदवली नसल्याची महिती वन विभागाचे अधिकारी मनोज कापुरे यांनी दिली. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर शासकीय कार्यालयांना वृक्ष लागवड मोहिमेचे वावडे निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
बातम्या आणखी आहेत...