आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एजन्सीचे गोडाऊनला सील, ६०० एलईडी बल्ब केले जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्र शासनाच्या स्वस्तात एलईडी बल्ब योजनेअंतर्गत ८५ रुपयांचे बल्ब १०० रुपयांना विकणाऱ्या शहरातील स्टाॅल्सवर एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या कंपनीने धडक कारवाई करत ६०० बल्ब जप्त केले. तसेच एजन्सीचे गोडाऊन सील करत कंपनी व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. जुनी एजन्सी तातडीने बंद करत नव्या एजन्सीला शहरामध्ये बल्ब विक्रीचे काम देण्यात आले आहे. यासंदर्भात ‘डीबी स्टार’ने १७ जून २०१६ रोजी ‘८५ च्या एलईडी बल्बची १०० रुपयांत विक्री’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून या प्रकाराला वाचा फोडली होती.
केंद्र शासनाने १०० रुपयांच्या एलईडी बल्बची किंमत कमी करून ८५ रुपये केली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हा दर संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आला. मात्र, औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून हा बल्ब सर्रास १०० रुपयांना विकला जात असल्याचे ‘डीबी स्टार’च्या तपासामध्ये समोर आले. ज्युबिली पार्क, हडको, अमरप्रीत चौक येथील स्टॉलवर १०० रुपयांना बल्बची विक्री होत असल्याचे त्यात आढळून आले. दरम्यान, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शहरातील स्टॉल्सची कसून चौकशी करत कारवाई केली आहे.

नव्या एजन्सीला दिले काम
जुन्या एजन्सीने अवैधरीत्या ८५ रुपयांचा बल्ब १०० रुपयांमध्ये विक्री केल्यामुळे ही एजन्सीच बंद करण्यात आली. आता रेडियंट नावाच्या नव्या एजन्सीद्वारे शहरातील स्टॉल्सवर बल्बची विक्री केली जात आहे. ग्रामीण भागतही याच एजन्सीचे स्टॉल्स असतील. शहरामध्ये दूध डेअरी, गजानन महाराज मंदिर चौक, मिल कॉर्नर, दर्गा चौक, प्रोझोन मॉल भागातील महावितरण कार्यालयाबाहेर आणि हनुमाननगर येथे नव्या एजन्सीचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत.

वाळूजचे गोडाऊन केले सील
‘डीबीस्टार’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर ईएसएसएल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरातील सर्व स्टॉल्सची चौकशी केली. तिथे १०० रुपयांना बल्बची विक्री केली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी व्हायावो कंपनीच्या वाळूज येथील गोडाऊनकडे मोर्चा वळवला आणि ते सील करत जवळपास ६०० बल्ब जप्त केले आहेत. तसेच कंपनी व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. स्टॉलवरील सर्व अर्ज, पावत्या जप्त केल्या आहेत. जुने १०० रुपये किंमत दर्शवणारे बॅनरही काढून घेतले आहे.

८५ रुपयांतच बल्ब खरेदी करावा
आम्ही तातडीने जुनी एजन्सी बंद केली आहे. आता रेडियंट नावाच्या एजन्सीला बल्ब विक्रीचे काम देण्यात आले आहे. आता ग्रामीण भागासह शहरात सर्वत्र याच एजन्सीचे काउंटर्स पाहायला मिळतील. त्यामुळे नागरिकांनी बल्ब ८५ रुपयांमध्ये नव्या एजन्सीच्या स्टॉलवरूनच खरेदी करावा. ईश्वरपिसाळकर, रिजनलहेड, ईएसएसएल
बातम्या आणखी आहेत...