आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर. सी. नसल्यामुळे नगर परिषदांच्या हद्दीत अंधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यातील पाच नगर परिषदांमध्ये 20 टक्के विजेची बचत करणारे एलईडी पथदिवे लावण्याचा मनोदय जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी व्यक्त केला होता. मात्र अशा पथदिव्यांचा शासकीय दर करार (रेट कॉन्ट्रॅक्ट) नसल्यामुळे त्यांनी माघार घेतली. निविदा प्रक्रियेत रिंग होऊन गैरव्यवहार होण्याची भीती असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. चांगले काम करण्याच्या प्रयत्नात गैरव्यवहाराचा ठपका नको म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नगर परिषद असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी अंधाराचे जाळे आणखी कायम राहणार हे स्पष्ट झाले आहे.

सध्या सिल्लोड, कन्नड, वैजापूर, गंगापूर आणि पैठण या नगर परिषदांच्या हद्दीत जुन्या पद्धतीचे पथदिवे आहेत. त्यांच्यासाठी येणारे वीज बिलही जास्त आहे. त्यातच हे पथदिवे वेळोवेळी खराब होतात. वीज बिल तसेच बल्ब बदलण्यासाठी येणारा खर्च मोठा आहे.

त्या बदल्यात अत्याधुनिक एलईडी पद्धतीचे दिवे लावले तर ते लवकर खराब होणार नाहीत शिवाय वीज बचत होईल आणि त्याचबरोबर दीर्घकाळ ते कार्यरत राहतील याची शाश्वती असल्यामुळे सर्व नगर परिषदांच्या शहरात असे दिवे लावण्याचा निर्णय विक्रमकुमार यांनी घेतला. त्यासाठी शासकीय दर काय आहेत याबाबत विचारणा केली. एलईडी लाइट बाबतीत शासनाने असा कोणताही दर करार कोणत्याही कंपनीसोबत केला नसल्याचे समोर आल्यानंतर थेट निविदा मागवा, असा सल्ला त्यांना देण्यात आला. मात्र या नव्या पद्धतीत निविदा मागविल्या तर वेगळीच गडबड होण्याची शक्यता असल्याने त्यांनी नकार दिला. शासकीय दरपत्रक आल्यानंतरच नर्णय होईल, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले आहे.