आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लीला सॅमसन व शिष्यांच्या विलक्षण वेगवान पदन्यासाने रोखले श्वास औरंगाबादकरांचे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विख्यात भरतनाट्यम नृत्यांगना व गुरू लीला सॅमसन यांचा उत्कट नि भावसमृद्ध नृत्याविष्कार, तर शिष्यांच्या विलक्षण वेगवान, कल्पक पदन्यासाने समूह नृत्याची परिभाषाच विस्तारणा-या अविष्काराने रसिकांना रोमांचकारी अनुभूती दिली. निमित्त होते हृदयाचा ठाव घेणा-या व डोळ्यांचे पारणे फेडणा-या शारंगदेव महोत्सवाचे.
एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात रविवारपासून या महोत्सवाला सुरुवात झाली. अर्थातच, महोत्सवाचे आकर्षण होते लीला सॅमसन व शिष्यांचे. प्रचलित समूह नृत्याची व्याख्याच विस्तारणा-या या शास्त्रीय नृत्य प्रकाराला सुरुवात झाली चेन्नईच्या कलाक्षेत्री या संस्थेतील युवा विद्यार्थ्यांच्या नृत्याने. पूर्णपणे भरतनाट्यम नृत्य; पण अगदी अनोख्या शैलीत. प्रचंड उर्जा, अतिशय वेगवान हस्तमुद्रा, पदन्यास व एकानंतर दुस-याने करावयाच्या हालचालीसुद्धा क्षणार्धात व त्याला अनुसरूनच, असा संपूर्ण नृत्याविष्कार बहरत गेला. कर्नाटकी संगीतातील तिस्त्र, चतुरस्त्र, मिश्र, खंड व संकीर्ण या लयींच्या जातींचा मिलाफ केलेल्या ‘स्पंदमात्रिका’ या थीमद्वारे युवा नर्तकांनी शब्दश: मुग्ध केले. लीला सॅमसन यांनी कालिदासरचित ‘कुमारसंभवम’मधील शिवपार्वतीचा विवाहाचा प्रसंग मोठ्या ताकदीने उभा केला. वयाची साठी पार केलेल्या तरीही त्यांच्या नृत्यातील चपळाई तरुण नर्तिकेला लाजवणारीच होती.
प्रगल्भ व तितक्याच सहजसुंदर प्रसन्न भावमुद्रा, हस्तमुद्रा व पदन्यास रसिकांसाठी विलोभनीय अनुभूती ठरली. आनंददायी प्रवासावर आधारित ‘चरिष्णू’ या प्रकारातून शिष्यांनी कार्यक्रमाचा समारोप केला तोही तितकाच लक्षवेधी ठरला. या कार्यक्रमाला सुरवात झाली ती पुष्पराज कोष्टी यांच्या सूरबहार वादनाने. तसेच महागामीच्या संचालिका पार्वती दत्ता यांच्या पारंपरिक ओडिसी नृत्यानेही बहार आणली.