आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहलीच्या बसचे ‘ब्रेक फेल’; अनर्थ टळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-बीबी का मकबरा आणि पैठण सहलीसाठी जालना येथील उर्दू हायस्कूलचे 60 विद्यार्थी व 5 शिक्षकांना घेऊन निघालेल्या खासगी बसचे बाबा पेट्रोल पंपच्या सिग्नलवर सकाळी 11 वाजता ब्रेक फेल झाल्याने परिसरात गोंधळ उडाला. चालकाचे प्रसंगावधान, वाहतूक पोलिसांची तत्परता व बसमधील विद्यार्थी, शिक्षकांनी आरडाओरड केल्याने रस्ता मोकळा झाला व मोठा अनर्थ टळला.

उर्दू हायस्कूलची सहल बुधवारी सकाळी 9.30 वाजता औरंगाबादकडे निघाली. 11 वाजता बाबा पेट्रोल पंपाच्या सिग्नलवर थांबली. सिग्नल सुटताच नॅशनल ट्रॅव्हल्सच्या डॉल्फिन नावाच्या बसचे (एमएच 20 डब्ल्यू 7227) ब्रेक फेल झाल्याचे चालक शेख अब्दुल रज्जाक शेख कादर (43, रा. जालना) यांना लक्षात आले. त्यांनी आरडाओरड सुरू केली. याच वेळी विद्यार्थी आणि शिक्षकांनी बसमधूनच रस्त्यावरून जाणार्‍या-येणार्‍या वाहनचालकांना ब्रेक फेल झाल्याचे सांगितले. शेख यांनी पंचवटी चौकाच्या दिशेने बस वळवली. तेथील वाहतूक पोलिसांच्या टू मोबाइलवर असलेले पोलिस उपनिरीक्षक शेख अकमल, नरेंद्र चव्हाण, संजय सदावर्ते, बाळू खडसन, राधाकिसन लिहिणार, सुनील धात्रक, कैलास काकड यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या सर्व रिक्षाचालकांना आणि वाहनचालकांना गाड्या बाजूला घेण्याच्या सूचना केल्या. तसेच 35 ते 40 ची गती असलेल्या या बससमोरील वाहतूक हटवण्यासाठी या बससोबतच व्हॅन चालवली. बस कर्णपुरा मैदानात गेल्यानंतर पोलिसांनी बसच्या चाकासमोर मोठे दगड लावले. बस थांबल्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला. यानंतर विद्यार्थ्यांना एसटी बसमध्ये रवाना करण्यात आले.

चालकाचे प्रसंगावधान

घटनेनंतर दहा लोक, काळीपिवळी आणि एका सुमोला चालकाने वाचवले. वाहतूक पोलिस, चालक आणि देवाच्या कृपेने आज मोठा अनर्थ टळला. अब्दुल मतीन अब्दुल रशीद, शिक्षक.