आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वच पक्षांत जोरदार रस्सीखेच, शिवसेना-भाजप युती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेसाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी रात्री उशिरा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणुकीची आचासंहिता रात्रीपासूनच सुरु झाली. २७ डिसेंबरला मतदान, तर ३० ला मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.

जिल्ह्यात सर्व मिळून ४३५ मते असलेल्या या जागेसाठी काँग्रेसच्या वतीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. कारण काँग्रेसचे मतदार सर्वाधिक आहेत. ही जागा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मिळावी, यासाठी राष्ट्रवादीचे नेतेही सक्रिय झाले आहेत. केंद्र राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष शिवसेनेने निवडणुकीसाठी अवसान आणले असले, तरी त्यांची ताकद मर्यादित आहे. शिवाय ते एकत्र लढतात की, स्वतंत्रपणे यावर त्यांची ताकद अवलंबून राहणार आहे. मात्र, पक्षीय स्वरुपापेक्षा प्रत्यक्ष रिंगणातील उमेदवारच या निवडीचे भवितव्य ठरवणार आहेत.

अरुणजगताप पुन्हा उत्सुक
सध्याराष्ट्रवादीचे अरुण जगताप हे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्यासाठी राष्ट्रवादीने ताकद पणाला लावली असली, तरी ही जागा सोडण्यास काँग्रेसचे नेते तयार नाहीत. गेल्यावेळी बंडखोरी करत जगताप अपक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार जयंत ससाणे यांच्यावर मात करत विजय मिळवला होता. ही जागा काँग्रेसला गेल्यास जगताप यांना पुन्हा अपक्ष म्हणून लढावे लागेल. काँग्रेसक़डून जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे की सुजय विखे, याबाबतची चर्चा आता पूर्णपणे विखेंवर केंद्रित झाली आहे. ससाणेंनी त्यातून अंग काढून घेतले आहे. गेल्यावेळी कार्यक्रम झाल्याने उमेदवारीसाठी ससाणे यांचे नाव थेट पृथ्वीराज चव्हाण यांनीच सूचवले असले, तरी ते उत्सुक नाहीत. विखेंच्या घरातील उमेदवार असल्यास जगताप कितपत ही निवडणूक लढवतील, याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. विजयाला गवसणी घालू शकतील, इतके मतदार "मॅनेज' करण्याची क्षमता हा उमेदवारीचा मुख्य निकष ठरणार आहे. ‘पन्नास-साठ कोटी खर्च करण्याची सहज तयारी असणाऱ्यांची ही निवडणूक असल्याची उघड चर्चा सध्या सुरू आहे. निवडणुकीचा शेवट होईपर्यंत हा आकडा आणखी किती मोठा होतो, हे पहावे लागेल.

भाजप-सेनेचा विजयरथ रोखण्यासाठी काँग्रेस सध्या मित्रपक्षांना झुकते माप देत असल्याचे राष्ट्रीय चित्र आहे. बिहार निवडणुकीतील निकालाने काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असून राष्ट्रवादीकडून नगरच्या जागेची होणारी जोरदार मागणी ऐनवेळी काँग्रेसकडून मान्य होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर ही जागा पारंपरिक आघाडीत काँग्रेसकडेच असल्याचे सांगत कोणत्याही परिस्थितीत ही जागा राष्ट्रवादीला सोडू नये, अशी आग्रही मागणी प्रदेश समितीकडे करण्यात आली आहे. राज्यस्तरावरील घडामोडीत जागा कोणाकडे जाते यावरच पुढील रणनिती अवलंबून राहणार आहे.
सेनेतर्फेराठोड, लामखडे चर्चेत

विधानपरिषदेच्या नगरच्या जागेबाबत शिवसेनेने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली. या निवडणुकीत सेना-भाजप एकत्र लढण्याची शक्यता आहे. भाजपने यापूर्वीच नगरच्या जागेवर दावा केला आहे. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची दोन दिवसांत मुंबई येथे बैठक होणार असून त्यात जागेचा निर्णय होणार आहे.

शिवसेनेतर्फे माजी आमदार अनिल राठोड, दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राष्ट्रवादीच्या गटातील माधवराव लामखडे यांच्यासह आणखी एक मोठे नाव चर्चेत आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी यापूर्वीच या जागेसाठी भाजपकडे सक्षम उमेदवार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ही जागा भाजपकडे राहते की सेनेकडे जाते याबाबतचा संभ्रम कायम आहे. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईत होणाऱ्या बैठकीत त्यावर तोडगा काढण्यात येणार आहे.
सेनेने मात्र जागेबाबतचा निर्णय होण्यापूर्वीच उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. अनिल राठोड, शशिकांत गाडे यांची नावे चर्चेत आहे. राष्ट्रवादीच्या गटातील माधवराव लामखडे हेदेखील सेनेकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. राठोड यांची शहरात लोकनेता अशी प्रतिमा आहे. ते विधान परिषदेवर जाण्यास कितपत इच्छुक आहेत, याबाबत शंकाच आहे. गाडे यांनी मागील निवडणुकीतच या जागेसाठी प्रयत्न केले होते. राठोड गाडे यांच्यात याच कारणामुळे बिनसले होते. परंतु मागील काही दिवसांपासून राठोड गाडे यांचे चांगले सूत जुळले आहे. त्यामुळे गाडे यांच्या उमेदवारीलाही सेनेकडून हिरवा कंदील मिळू शकतो. याव्यतिरिक्त सेनेकडून शहरातील एका मोठ्या व्यक्तीला या निवडणुकीत उतरवण्याची चाचपणी सुरू आहे. भाजपने नगरच्या जागेवर दावा केला असला, तरी सेनेने जोरदार तयारी सुरू केली. यावरूनच ही जागा सेनेच्या वाट्याला सुटण्याची शक्यता अधिक आहे.

भाजपची पाचपुते यांनाच पसंती
भाजपनेजोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी यापूर्वीच ही निवडणूक भाजप स्वतंत्रपणे लढणार असल्याचे जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात या निवडणुकीत शिवेसेनेबरोबर युती करायची किंवा नाही याचा निर्णय हा प्रदेशस्तरावरच घेतला जाईल. भाजपकडून स्वतंत्र निवडणूक लढण्याचा दावा केला जात असताना पक्षाकडे चेहरा असलेला एकही उमेदवार नाही. त्यामुळे भाजपने अन्य पक्षांच्या नेत्यांना या निवडणुकीसाठी गळ घालण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपत दाखल झालेले माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या नावाची चर्चा असली, तरी प्रत्यक्षात पाचपुते यांच्या नावाला पक्षातूनच विरोध होण्याची अधिक शक्यता आहे. पारंपरिक युतीत ही जागा शिवसेनेकडे आहे. युती होऊन जागा भाजपला मिळाल्यास पाचपुते यांनाच संधी देण्यात येणार असल्याचे पक्षातील सूत्र सांगत आहेत. राजकारणातील अनुभव सर्वांशी असलेली त्यांची जवळीक या दोन्ही बाबी त्यांच्या पथ्यावर पडणार आहेत.

पालकमंत्री असताना बबनराव पाचपुते यांनी सलग दाेन वर्षे पडलेला दुष्काळ यशस्वीपणे हाताळला होता. तसेच नगर शहरातील अितक्रमण हटवण्याबाबतही ठोस भूमिका घेतली होती. पालकमंत्री पदाच्या माध्यमातून त्यांनी जिल्हाभरात मोठा संपर्क प्रस्थापित केला होता. याचा त्यांना या निवडणुकीत मोठा फायदा मिळणार आहे. तसेच सहानुभुतीच्या लाटेतून त्यांना फायदा होण्याचा अंदाज भाजपकडून बांधला जात आहे. मात्र, अंितम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील.

दिवाळी भेटीतून आठवण
निवडणुकीच्यापार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने मतदारांना आवर्जून दिवाळी भेट पाठवली होती. महापालिकेच्या ६८ नगरसेवकांपर्यंत ही भेट पोहोचली असल्याची चर्चा गेल्या चार दिवसांपासून शहरात सुरु आहे. भेट नेमकी काय होती, याबाबत बोलण्यास कोणी तयार नसले, तरी भेटीचे पॅकिंग खूपच आकर्षक असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले. नगरसेवकांसह जिल्ह्यातील इतर मतदारांपर्यंत देखील ही "आठवण भेट' पोहोचली आहे.

२७ डिसेंबरला मतदान
निवडणूकआयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २७ डिसेंबरला मतदान, तर ३० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी १६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मंगळवारी रात्रीपासूनच आचारसंहिता लागू होणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय घडामोडींना आता अधिक वेग येणार आहे.

१९८५ मध्ये शंकरराव कोल्हे (अपक्ष) विरुद्ध ज. य. टेकावडे (काँग्रेस). लढतीत टेकावडे विजयी
१९९१ ज. य. टेकावडे (काँग्रेस) विरुद्ध मधुकर देशमुख (बंडखोर काँग्रेस). लढतीत टेकावडे विजयी
१९९६ मध्ये डॉ. भारत ढोकणे (शिवसेना) विरुद्ध यशवंत गडाख (काँग्रेस) लढतीत गडाख विजयी,
२००३ मध्ये ममता पिपाडा (अपक्ष) विरुद्ध यशवंतराव गडाख (काँग्रेस). यामध्ये यशवंतराव गडाख विजयी
२००९ अरुण जगताप (बंडखोर अपक्ष) विरुद्ध जयंत ससाणे (काँग्रेस) विरुद्ध डॉ. राजेंद्र पिपाडा (शिवसेना). तिरंगी लढतीत जगताप विजयी.
१२७ काँग्रेस
८३ राष्ट्रवादीकाँग्रेस
९१ भाजप
७४ शिवसेना
मनसे
रासप
मराठा महासंघ
भाकप
शेलार गट
रिपाइं
१४ अपक्ष
४३५ एकूण
राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार फिल्डिंग
विधान परिषदेच्या मागील निवडणुकीच्यावेळी (२००९) काँग्रेसचे उमेदवार जयंत ससाणे, शिवसेनेकडून डॉ. राजेंद्र पिपाडा अपक्ष अरुण जगताप रिंगणात होते. या निवडणुकीत जगताप यांचा विजय झाला होता. ससाणे यांना १४८ तर जगताप यांना १८६ मते तर पिपाडांना १२ मते मिळाली होती. सध्या जगताप राष्ट्रवादीत आहेत. राष्ट्रवादीकडून पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळेल असे काही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. पण इच्छुकांच्या यादीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, यशवंत गडाख, अशोक काळे, सिद्धार्थ मुरकुटे यांचीही नावे चर्चेत आहे. मात्र, अंतिम निर्णय पक्षपातळीवरच होणार आहे. त्यामुळे चर्चेतील उमेदवार संभ्रमात आहेत.