आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत बिबट्याने लावले कामाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पिंजर्‍यातून पळालेल्या बिबट्याने अधिकारी व कर्मचार्‍यांची झोप उडवली असून प्रशिक्षित पथक निर्माण करून बिबट्यासाठी दणकट पिंजरे तयार करण्याच्या हालचाली वन विभागाने सुरू केल्या आहेत.

माकडाच्या पिंजर्‍यता जेरबंद बिबट्याला बुधवारी शहरातील वन विभाग कार्यालयाच्या परिसरात आणले होते. पिंजरा कमकुवत असल्यामुळे गज वाकवून बिबट्या बाहेर पडला होता. लोकवस्तीत हा प्रकार घडल्यामुळे वन विभागाची धांदल उडाली होती. शेवटी गुरुवारी सकाळी नाशिक आणि पुणे येथील पथकाच्या साहाय्याने बिबट्याला पकडण्यात यश आले. औरंगाबाद वन विभागाकडे प्राण्यांना पकडण्यासाठी प्रशिक्षित कर्मचार्‍यांचा अभाव व बिबट्यासारखे हिंस्र प्राणी जेरबंद करण्यासाठी चांगल्या दर्जाचे पिंजरे नसल्याची माहिती समोर आली. वन विभागाच्या अधिकार्‍यांनी यासंदर्भात एक बैठक घेतली. अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रशिक्षणाच्या मुद्दय़ावर भर देण्यात आला. पिंज-याची देखभाल करून ते सुस्थितीत करण्याचे आदेशही देण्यात आले. सध्या वन विभागाकडे 9 पिंजरे चांगल्या स्थितीत आहेत, तर 15 पिंर्ज‍याची दुरवस्था झाली आहे. औरंगाबाद विभागात एकूण 10 परिक्षेत्रे आहेत. कन्नड, अजिंठा, सोयगाव, जाफराबाद, भोकरदन परिसरात प्राण्यांचा वावर आहे. माणसावर हल्ला करणार्‍यांमध्ये बिबटे, लांडगा, तडस आणि अस्वल, रानडुक्कर या प्राण्यांचा समावेश आहे.

बिबट्या दिसल्यास घ्या काळजी
हिंसक प्राणी मानवी वस्तीत गेल्यास ते तणावात येतात. ते सतत गुरगुर करतात. त्या वेळी त्यांच्या भोवताली गर्दी करू नये. केल्यास त्याची हिंसकवृत्ती जागी होते आणि तो हल्ला करू शकतो. रात्री घराबाहेर निघताना टॉर्च किंवा लाकडी दंडुका हातात घ्यावा. शक्यतो समूहाने घराबाहेर पडावे. नागरी वसाहतीत बिबट्या आला तर खिडक्या दरवाजे बंद करून घरातच बसावे. आरडाओरड होणार नाही याची काळजी घ्यावी.

लाल रंगाची ओळख
प्राण्यांना इतर कुठलाही रंग ओळखता येत नाही. मात्र, लाल रंग ओळखता येतो. माणसाचा त्यांना गंध येतो. बिबट्याला पिंजर्‍यता ठेवले तर तो सर्व शक्ती पणाला लावून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो.

जंगलावर बिबट्याचेच राज्य
21 व्या शतकात जंगलाचा राजा बिबट्याच असल्याची माहिती पुढे आली आहे. 1868 मध्ये कर्नल नाइटइंगल यांनी 30 वाघांना ठार मारल्याची नोंद आहे. 1961 आणि 1970-71 मध्ये केवळ एक वाघ दिसल्याची नोंद आहे. गेल्या 40 वर्षांत एकही वाघ दिसला नाही. शिवाय 2012 मध्ये झालेल्या प्राण्यांच्या गणनेतही वाघाचा उल्लेख नाही. मात्र बिबट्या, लांडगे, तडस आणि अस्वल या हिंसक प्राण्यांची नोंदणी झाली आहे.

प्राण्यांचा आहार
बिबट्या : गायी, म्हशी, शेळी, हरीण आदींची शिकार करतो.
लांडगा : शेळी, मेंढी, वासरू या लहान प्राण्यांची शिकार करतो.
तडस : लांडग्याप्रमाणेच लहान प्राणी त्याचे भक्ष आहे.
अस्वल : शाकाहरी आणि मांसाहरी आहे. तो रानफळे खातो.
तडस आणि लांडगा मोठय़ा प्राण्यांनी केलेल्या शिकारीच्या शिल्लक अवशेषावर ताव मारतात.

प्रशिक्षणाचे काम हाती..
बिबट्या प्रकरणानंतर आम्ही आमच्या अधिकार्‍यांना प्रशिक्षण देणार आहोत. हिंस्र प्राण्यांसाठी मजबूत पिंजरे तयार केले जाणार आहेत. ए. डी. भोसले, उपवनरक्षक वन खाते