आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leopard In Kolhati Area Issue At Waluj Aurangabad

वडगाव कोल्हाटीत बिबट्याचा वावर?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - गावालगतच्या शेतात असलेल्या डीपीवरील फ्यूज टाकण्यासाठी गेलेल्या लाइनमनला शेजारील नाल्यामध्ये बिबट्या दिसला. बिबट्याला पाहताच लाइनमनची घाबरगुंडी उडाली अन् त्याने थेट गावात धूम ठोकली. भेटेल त्याला ‘मला बिबट्या दिसला’ असे सांगत सुटला. गावभर या चर्चेला उधाण आले, अखेर संबंधित शेतमालकाने घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून तो बिबट्या नसून तरस असल्याचा दावा वन विभागाने केला. मात्र, वन विभागाने तो प्राणी लवकर पकडावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.
वडगाव कोल्हाटी गावालगतच्या गट नंबर ६८ मध्ये कृष्णा साळे यांचे शेत आहे. तेथील डीपीवरील फ्यूज टाकण्यासाठी बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान लाइनमन गजानन कटारे गेले. लगतच्या नाल्यामध्ये त्यांना आवाज आला. आवाजाच्या दिशेने त्यांनी हातातील बॅटरी चमकवली असता त्यांना अंगावर काळे पट्टे असणारा प्राणी दिसला. सदरील प्राण्याला पाहून कटारे यांची बोबडीच वळाली. "बिबट्या... बिबट्या...' असे म्हणत त्यांनी गावाच्या दिशेने धूम ठोकली.
बिबट्या दिसल्याचा दावा कटारे करत असल्यामुळे गावात भीतीचे वातावरण िनर्माण झाले. अखेर गावकऱ्यांनी शेतमालक साळे यांच्यासह सदरील प्राणी दिसला त्या ठिकाणी धाव घेतली. पाण्यालगत प्राण्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या. साळे यांनी वन विभागाला घटनेची माहिती फोनद्वारे दिली. माहिती िमळताच खुलताबाद वन विभागाचे प्रादेशिक वनक्षेत्रपाल एस. वाय. गवंडर, दौलताबाद विभागाचे वनरक्षक जी. एस. राठोड, वनपाल एल. बी. पवार, वनमजूर प्रभुदास हजारे, रामेश्वर राठोड यांनी गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घटनास्थळी भेट दिली. त्या ठिकाणी आढळून आलेल्या पाऊलखुणांची पाहणी करून तो बिबट्या नसून तरसच असल्याचा दावा वन विभागाने केला.
तो बि‍बट्या नव्हेच
-पाऊलखुणा, हल्ला करण्याची पद्धती आदींवरून बिबट्याची ओळख पटवता येते. या ठिकाणी आढळून आलेल्या पाऊलखुणांचे निरीक्षण केल्यानंतर तो बिबट्या नसल्याचे आढळून आले. तो तर ठिपके असणारा तरस आहे. तरीसुद्धा नागरिकांनी दक्षता म्हणून रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना बॅटरी, काठी सोबत बाळगावी.
एस. वाय. गवंडर, प्रादेशिक वनक्षेत्रपाल, खुलताबाद.