आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्निशमन केंद्रे कागदावरच, अग्नी सुरक्षा नियमांची होतेय पायमल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पन्नासहजार लोकसंख्येला एक अग्निशमन केंद्र असावे, असा अग्नी सुरक्षा विभागाचा नियम आहे. मात्र, औरंगाबाद मनपा नगरपालिका याला अपवाद आहे. १५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात मनपाची केवळ तीन केंद्रे कार्यान्वित आहेत. शहरात पाच आणि नगरपालिकांमधील सहा अशी एकूण ११ केंद्रे कागदावरच आहेत. यामुळे आगीपासून होणारी हानी कमी करण्यासाठी प्रशासनाला अपयश येत आहे.
शहरात पदमपुरा, सेव्हन हिल्स आणि चिकलठाणा तसेच जिल्ह्यात पैठण नगरपालिका, वाळूज आणि चिकलठाणा एमआयडीसी अशा एकूण सहा ठिकाणी अग्निशमन केंद्रे आहेत. सिल्लोड, कन्नड, सोयगाव, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद नगरपालिकेतील केंद्रे अनेक वर्षांपासून प्रस्तावित आहेत.

वेळेत मिळत नाही मदत : अग्निशमनकेंद्रांचा अभाव असल्याने मनपा अग्निशमन केंद्रालाच सर्वाधिक फोन कॉल येतात. त्यानुसार वर्षभरात २४८ कॉल आले आहेत. पैकी १५५ महत्त्वाच्या कॉलनुसार घटनास्थळी जाऊन सुमारे ३२ कोटींची वित्तहानी, २३ जणांचे प्राण वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र, केंद्रापासून आगीचे ठिकाण लांब पडत असल्याने १० कोटींची वित्तहानी ३१ जणांचे प्राण वाचवण्यात अपयश आले आहे. ३० जून २०११ रोजी सिल्लोडनजीक विहिरीत बस कोसळली होती. वेळेवर मदत मिळाल्याने १४ प्रवाशांचा मृत्यू झाला. जुलै २०१२ रोजी मुकुंदवाडीतील गणपती विसर्जन विहिरीत बुडून तिघांचा मृत्यू झाला. अपघाताचे सत्र सुरूच असून हानीचे प्रमाण वाढतच चालले आहे.

आजपासून अग्निशमन सेवा सप्ताह : मनपाअग्निशमन विभागातर्फे १४ ते २० एप्रिलदरम्यान पदमपुरा येथे अग्निशमन सेवा सप्ताह राबवण्यात येणार आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहण होईल. त्यानंतर १४ एप्रिल १९४४ मध्ये मुंबई गोदीत झालेल्या स्फोटात हुतात्मा झालेले ६६ अग्निशमन अधिकारी, कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. सात दिवस व्याख्याने, प्रात्यक्षिके, प्रदर्शन शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी निधी संकलित केला जाणार आहे.

पदभरतीसाठी प्रयत्न सुरू
^शहरात तीनच केंद्रे कार्यान्वित असून पाच केंद्रे २०१२ पासून प्रस्तावित आहेत. शहागंज, टीव्ही सेंटर, हर्सूल, मिटमिटा आणि पैठण रोड येथे ती उभारायची आहेत. त्यासाठी एक कोटी ७८ लाखांचा निधी सरकारकडून मंजूर झाला. पण एका केंद्राला ३२ कर्मचारी असे पाच केंद्रांचे १६० इतर केंद्रांसाठी ९० अशा २५० पदभरतीला मंजुरी मिळाली नाही. प्रयत्न सुरू आहेत. शिवाजीराव झनझन पाटील, अग्निशमनअधिकारी, मनपा.

साहित्य वापरणे बंधनकारक
अग्नीसुरक्षा विभागाच्या नियमाप्रमाणे पुरातन देवस्थान, खासगी मॉल्स, रुग्णालये, कारखाने, चित्रपटगृह, गॅस एजन्सी, पेट्रोल पंप, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी आग विझविण्याचे साहित्य लावणे बंधनकारक आहे. तसेच त्या साहित्याचा तेथील कर्मचाऱ्यांना वापर करता येणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी त्यांना प्रशिक्षित करणे, त्याची तपासणी करण्याचे काम होत नसल्याचेही उघड झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...