आैरंगाबाद - ग्राहकाने दहा हजाराची मागणी केल्यावर एटीएममधून केवळ दीडच हजार रुपये निघाल्याच्या प्रकरणात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जाधववाडी शाखेला ग्राहक तक्रार निवारण मंचाने दहा हजार रुपये दंड ठोठावला. एटीएममधून निघालेली पाचशेची एक नोट फाटकी होती. त्याबदली ५०० रुपये द्यावेत. तसेच २६ ऑगस्ट २०१४ ते २२ मे २०१५ या काळातील प्रतिदिन १०० रुपयांप्रमाणे रक्कम ग्राहकास देण्याचे आदेश मंचाने बँकेला दिले. यामुळे १० हजारांच्या बदल्यात बँकेला ग्राहकाला आता २६ हजार ९०० रुपये द्यावे लागणार आहेत.
बँकेने ग्राहकास मानसिक त्रास झाल्याबद्दल १० हजार रुपये दंडाच्या स्वरूपात द्यावे. पाचशेची फाटकी नोट बदलून द्यावी. ग्राहकाने तक्रार दिल्याला २६९ दिवस झाले. रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे आजपर्यंत प्रतिदिन शंभर रुपयांप्रमाणे विलंब आकार द्यावा. ग्राहकास त्रुटीपूर्ण सेवा देताना वेळीच रकमेचा परतावा न केल्याने प्रतिदिन शंभर रुपये देण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या नियमाची पायमल्ली केल्याचे ग्राहक मंचाचे अध्यक्ष के. एन. तुंगार, सदस्य के. आर. ठोले व श्रीमती एस. एस. बारलिंगे यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
ग्राहक राहुल उत्तमचंद पारख यांनी अॅड. उमेश रुपारेल यांच्यामार्फत ग्राहक मंचात धाव घेतली. बँकेकडे दाखल अर्जाची प्रत, एटीएमची पावती, पाचशे रुपयांची फाटकी नोट या बाबी तक्रारीसोबत दाखल करण्यात आल्या. ग्राहकाने बँकेकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली; परंतु एटीएममधून रक्कम काढण्याच्या घटनेस ९० दिवस पूर्ण झाल्याने फुटेज देता येणार नसल्याचे सांगण्यात आले. ग्राहकास नऊ महिने बँकेने झुलवत ठेवले.
असे झाल्यास ग्राहकांनी काय करावे?
एटीएममधून मागणीनुसार रक्कम न आल्यास त्वरित टोल फ्री नंबरवर प्रथम तक्रार द्यावी. नंतर खाते असलेल्या शाखेत जाऊन लेखी तक्रार द्यावी. व्यवहार झाल्याची एटीएम पावती सोबत ठेवावी. उपरोक्त प्रकरणात बँकेच्या चेअरमनकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी करता येते. बँकेला सहा महिने संबंधित सीसीटीव्ही फुटेज सांभाळून ठेवावे लागते. एटीएम व क्रेडिट कार्डच्या व्यवहारावर नियंत्रणासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया काम करते. उपरोक्त अॅथॉरिटीच्या नियमाप्रमाणे बँकेकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केल्यास त्यांना त्वरित फुटेज उपलब्ध करून द्यावे लागते.
सुरक्षा रक्षक व तक्रार पुस्तिका ठेवणे
प्रत्येक एटीएमवर सुरक्षा रक्षक व तक्रार पुस्तिका ठेवणे गरजेचे आहे. व्यवहारानंतर सात दिवसांत तक्रारीची अट आहे. प्रत्यक्षात बँका ग्राहकांना झुलवत ठेवतात व वेळ निघून गेल्यावर तक्रार घेत नाहीत. सहा महिने सीसीटीव्ही फुटेज सांभाळून ठेवावे लागते.
-अॅड. उमेश रुपारेल, ग्राहकाचे वकील
पाचशेची फाटकी नाेट
राहुल उत्तमचंद पारख (हडको) सात वर्षांपासून स्टेट बँकेच्या जाधववाडी शाखेचे ग्राहक आहेत. २६ ऑगस्ट २०१४ रोजी जाधववाडीतील एटीएमवर १० हजार रुपये काढण्यासाठी ते गेले. पण दीड हजार रुपयेच निघाले. त्यात पाचशेची एक २० टक्के फाटलेली नोटही होती. याबाबत त्यांनी शाखा व्यवस्थापकांकडे तक्रार नोंदवली.
बँकेची भूमिका
बँकेने तीन दिवसांनंतर पूर्ण व्यवहार झाल्याचे कळवले. प्रकरणाची त्रयस्थ एजन्सीकडून चौकशी केली. राहुलच्या एटीएम व्यवहारानंतर पाच मिनिटांत दुसरा व्यवहार झाल्याचे सांगण्यात आले.