आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुलैच्या पंधरवड्यात केवळ 32.8 मिमी पाऊस; कृषी, उद्योग, व्यवसाय, पर्यटन सर्वच घटकांवर परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जुलैच्या पंधरवड्यातील हमखास पावसाने यंदा दगा दिला असून केवळ ३२.८ मिमी पाऊस पडल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. जुलै २०१५ च्या पंधरवड्यात पाऊस पडलाच नव्हता. तर यंदाच्या जुलै पंधरवड्यात सर्वात कमी पाऊस पडण्याचा नवा विक्रम झाला आहे. मान्सूनमध्ये २० दिवसांचा मोठा खंड, भुरभुर अन् अनिश्चित पावसाने शेतकऱ्यांबरोबर सर्वांनाच अस्वस्थ केले आहे. बऱ्याच विभागात दुबार पेरणीचे संकट ओढवले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे.
 
यंदा सलग दुसऱ्या वर्षी मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला मान्सूनचे जोरदार आगमन झाले. २० जूनपर्यंत अधूनमधून जोरदार पाऊस पडला. जून ते ३० जूनपर्यंत १७९.९ मिमी पाऊस पडला आहे. जूनचा शेवटचा आठवडा जुलैच्या पंधरवड्यात नाममात्र पाऊस पडला आहे. खंडाचे प्रमाण जास्त राहिले आहे. त्यामुळे जूनमध्ये पडलेल्या विक्रमी पावसाने पाहिजे तसा फायदा झालेला नाही. जलस्राेत तहानलेले आहेत. खरिपातील पिकांची वाढ थांबली असून पिके माना टाकू लागली आहेत. मागील ३० वर्षांचा विचार केला असता जूनमध्ये पाऊस नाही पडला तरी औरंगाबादसह मराठवाड्यात जुलैमध्ये हमखास सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो. तशी जुलैमधील पावसाच्या नोंदी हवामान विभाग हवामान शास्त्रज्ञांनी घेतल्या आहेत. मात्र, हवामानात अनपेक्षित वेगाने बदल होत आहेत. या बदलत्या वातावरणामुळे जुलै २०१५ ला प्रथमच जुलैच्या पंधरवड्यात पाऊस पडलाच नाही. यंदा सर्वात कमी म्हणजे केवळ ३२.८ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे. अनिश्चित पर्जन्यमानामुळे कृषी, बाजार, व्यापार, पर्यटन, उद्योग, व्यवसायावर विपरीत परिणाम होत असून सर्वस्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.

वातावरणातील घटकच ठरवणार पावसाची दिशा
सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज हवामान संस्थांनी वर्तवला खरा, पण वातावरणातील घटकच पावसाची दिशा निश्चित करतील. पाऊस कधी येईल?, किती दिवसांत पडेल? खंडाचे दिवस किती? याबाबत काहीच सांगितले जात नाही. तसे तंत्रज्ञानही नाही. त्यामुळे आर्द्रता, हवेचा वेग, तापमान, बाष्प घेऊन येणारे वारे, ढग, स्थलनिहाय वातावरण पावसाची दिशा ठरवतील. वातावरणातील बदल पोषक राहिले तरच निश्चित पाऊस पडेल, असे तज्ज्ञ सांगतात.
 
अर्ध्या शहरात सरीवर सरी, अर्धे शहर कोरडेठाक
स्थल निहायपडणाऱ्या पावसात कमालीचा फरक आहे. अर्ध्या शहरात सरीवर सरी कोसळतात तर अर्धे शहर कोरडेठाक राहत आहे. अशीच स्थिती सर्वत्र बघायला मिळते. जेथे पावसासाठी अनुकूल सापेक्ष आर्द्रता ७० टक्क्यांवर, कमी हवेच्या दाबाचे पट्टे, पाऊस घेऊन आलेल्या ढगांचे अाच्छादन असते अशा ठिकाणी सरीवर सरी कोसळत आहेत, तर जेथे या पोषक वातावरणाचा अभाव आहे, हवेचा वेग वाढलेला आहे, अशा ठिकाणी पाऊस हुलकावणी देत आहे. पडणाऱ्या पावसाच्या फरकामुळे सर्वत्र आश्चर्य चिंता व्यक्त केली जात आहे.
 
यंदा प्रथमच पश्चिम वाऱ्याने पळवला पाऊस
बंगालच्या उपसागरातून मध्य भारतात जो पाऊस अपेक्षित असतो तो पश्चिमी वारे यंदा प्रथमच पूर्वेकडे घेऊन गेले. त्यामुळे परभणी, नांदेड, लातूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. तर औरंगाबाद, जालना, हिंगोली, उस्मानाबाद, बीड जिल्हा वंचित आहे. आता मध्य भारतात पोषक वातावरण असून ४८ तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. श्रीनिवासऔंधकर, हवामान तज्ज्ञ, नांदेड.
बातम्या आणखी आहेत...