आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या पिढीला रस्त्यावर उतरवण्याची तयारी करावी,‘दिव्य मराठी’च्या विशेष चर्चेत उमटला सूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पक्षादेश, वेळेचा अभाव यामुळे मराठवाड्याच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी सभागृहात बोलण्याची संधी मिळत नाही. तेथे प्रयत्न करण्याबरोबरच संघटनांना सोबत घेऊन सर्वच स्तरांवर लढा द्यावा लागेल, आंदोलनापासून दूर झालेल्या युवा पिढीला रस्त्यावर उतरवावे लागेल, असा सूर सोमवारपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात मराठवाड्याचा आवाज कसा राहील, या विषयावर ‘दिव्य मराठी’च्या वतीने आयोजित विशेष चर्चेत उमटला.
शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट व संतोष सांबरे, अपक्ष प्रशांत बंब, राष्‍ट्रवादीचे चंद्रकांत दानवे, शेतकरी संघटनेचे श्रीकांत उमरीकर, अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका तथा देवगिरी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य आरती डोग्रा, शहर प्रगती आघाडीचे नगरसेवक समीर राजूरकर सहभागी झाले होते. जायकवाडीत वरील धरणांतून हक्काचे पाणी सोडण्यात यावे या प्रमुख मागणीसह आपापल्या मतदारसंघातील विविध प्रश्नही आमदार सभागृहात मांडणार आहेत. मात्र, नागपूरचे अधिवेशन जेमतेम 8 दिवस चालते. त्यात 7 हजारांवर तारांकित प्रश्न आलेले असतात. त्यातील 200 च्या आसपास लागतात. चर्चेसाठी वेळ अत्यंत कमी असतो. त्या वेळेत पक्षप्रमुख किंवा गटप्रमुख बोलतो. त्यामुळे अमुक विभागाचे प्रश्न मांडण्यासाठी आमदारांना संधीच मिळत नाही, अशी स्पष्ट कबुली या आमदारांनी दिली. त्यामुळे आपल्या विभागाचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध संघटना तसेच तरुणांना मदतीला घेऊन सर्व स्तरांवर लढा देण्याची गरज या वेळी प्रतिपादित करण्यात आली. अलीकडे तरुण मंडळी आंदोलनापासून दूर गेल्याने चळवळ उभी राहत नाही. तरुणांना रस्त्यावर उतरवण्यास भाग पाडावे. त्याशिवाय मोठे प्रश्न सुटणार नाहीत, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
आमदार आणि त्यांचे प्रश्न
संजय शिरसाट - शहराचा विकास व्हावा, उंच इमारती व्हाव्यात यासाठी शहराला 1 एफएसआय वाढून द्यावा, शहर विकासाच्या उपविधीत बदल करण्याची संचिका दीड वर्षापासून मुख्यमंत्र्यांकडे पडून आहे, त्याचा पाठपुरावा करणे, टीडीआरचे झोनिंग करणे, ए झोनमधला टीडीआर त्याच भागात वापरण्याची परवानगी देणे, सिडकोचे लीज डीडचे फ्री होल्ड करण्यासाठी पाठपुरावा करणे.
चंद्रकांत दानवे - सिल्लोड-भोकरदन-जालना या 85 किलोमीटर लांब नि 370 कोटी खर्चाच्या रस्त्यासाठी पाठपुरावा करणे, खडकपूर्ण धरणातून भोकरदनला पाणीपुरवठा करणे, मतदारसंघात 4 नवीन केटी वेअरसाठी पाठपुरावा, 33 केव्हीची दोन उपकेंद्रे, गाव तेथे सिमेंट बंधा-यासाठी निधी उपलब्ध करून घेणे, जाफराबादला नगर परिषदेचा दर्जा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा.
प्रशांत बंब- जायकवाडीचे हक्काचे पाणी मिळवून देणे हा मुख्य अजेंडा. आणेवारीचे निकष बदलण्यासाठी पाठपुरावा.
संतोष सांबरे- बदनापूरच्या पाणीपुरवठ्याच्या 18 कोटी योजनेच्या मान्यतेसाठी पाठपुरावा, राजूरला तालुका तसेच तीर्थक्षेत्राचा दर्जा देणे, बदनापूरला 500 हेक्टरवर एमआयडीसी, फळबाग पीक विमा योजनेतील घोळाविरुद्ध आवाज उठवणे.