आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lets Go Pandhari : S.T. Availabel 3500 Buses For Ashadhi Prilgrim

चला पंढरीला: आषाढी यात्रेसाठी राज्यात एसटीच्या 3500 बसेस उपलब्ध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणा-या लाखो भाविकांसाठी एसटी महामंडळाने 3500 बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातून 120, तर विभागातून 1070 बसेस सोडण्यात आल्या आहेत. भाविकांच्या सोयीसाठी सर्वच स्थानकांवर वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात येणार आहे.


पंढरपूर यात्रेसाठी 15 ते 23 जुलैदरम्यान एसटी महामंडळातर्फे विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. 19 व 22 जुलै रोजी जास्तीच्या बसेसही सोडण्यात येणार आहेत. तसेच खासगी वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखेची, तर बसमधील प्रवाशांना काही त्रास झाल्यास, लहान मोठा अपघात झाल्यास सुरक्षा आणि तातडीची सेवा देण्याच्या दृष्टीने महामंडळाकडून विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत ते गस्त घालण्याचे काम करणार आहेत.
सुरक्षा अधिकारी नियुक्त : यात्रेकरूंच्या सेवेसाठी पंढरपूर यात्रा मुख्य दक्षता अधिकारी म्हणून व्ही. बी. शेंदारकर यांची नियुक्ती केली आहे. गाड्यांचे नियोजन विभाग नियंत्रक संजय सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक अधिकारी प्रकाश हजारे, किशोर सूयर्वंशी, प्रमोद महेंद्रकर, उद्धव वावरे, गोविंद कबाडे, एल. व्ही. लोखंडे, श्याम महाजन, विनायक बोरसे हे करत आहेत.


चंद्रभागेच्या किनारी असणार बसस्थानक
यात्रा कालावधीत वारक-यांच्या गर्दीमुळे पंढरपूर शहरात बस जाणार नसून, चंद्रभागेच्या तीरावर यात्रा बसस्थानक सुरू करण्यात आले आहे. तेथे शेड क्र. 1 मध्ये औरंगाबाद जिल्ह्यांच्या गाड्या लागणार आहेत. जिल्ह्यातील वारक-यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाचे 10 कर्मचारी पंढरपूरला जाणार आहेत.


प्रवास बसनेच करा
सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या बसचा वापर करावा. खासगी वाहनाने प्रवास करू नये.
सुभाष देवकर, विभागीय सहायक अधिकारी


प्रवाशांच्या सोयीसाठी आगाऊ आरक्षण
यात्रेच्या कालावधीत प्रवाशांसाठी आगाऊ आरक्षण सेवा उपलब्ध आहे. तसेच ज्या गावातून 50 वारकरी बसची मागणी करतील त्यांना गावातून येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
संजय सुपेकर, विभागीय नियंत्रक