आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे नेऊन ठेवले औरंगाबाद माझे?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रति,
मा. प्रकाश महाजन, राजेंद्रसिंह
महापालिका, पोलिस आयुक्त, औरंगाबाद.
महोदय,
विधानसभा निवडणुकीची धामधूम आटोपून आपण शहराच्या कामात लक्ष घातले, असे ऐकिवात आले होते. राज्यात सरकार कुणाचेही असले तरी प्रत्यक्ष कारभार नोकरशाहीच चालवत असते. राज्यकर्त्यांना अवघड वाटणारी अनेक कामे तुम्ही सोपी करतात, तर सोपी कामे नियमांवर बोट ठेवून अशक्य करून टाकतात. त्यामुळे तुमच्याकडेच लोक आशेने, अपेक्षेने बघत असतात. म्हणूनच १४ लाख औरंगाबादकरांचे दु:ख सांगण्यासाठी आपणास भेटण्याचा, बोलण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला. एक-दोन वेळा त्यात यशही मिळाले. मात्र, तुमच्याकडे तेवढा वेळ नाही. प्रश्नाच्या खोलात जाऊन त्याची तड लावावी अशी भूमिका दिसली नाही. त्यावर अखेरचा उपाय म्हणून हे पत्र लिहीत आहे.

महोदय महाजनसाहेब, औरंगाबाद महापालिकेचा कारभार बिघडला आहे, हे नव्याने प्रकाशात आणण्याची गरज नाही. मात्र, बिघडलेला कारभार सुधारण्याची जबाबदारी तुमच्यावरच आहे, हे विनम्रतापूर्वक लक्षात आणून द्यायचे आहे. कारण ऐन िदवाळीच्या काळात मनपाचे सफाई कर्मचारी संपावर गेले. तेव्हा तुम्ही राजकीय शिष्टमंडळ भेटीला येईपर्यंत वाट पाहत थांबलात. त्यांच्या सांगण्यावरून कर्मचाऱ्यांना काही आश्वासने देऊन संप मागे घ्यावयास लावला. त्यानंतर खरेतर तुम्ही सफाईची काय अवस्था आहे, याची पाहणी करण्यासाठी शाही चारचाकीतून का होईना फेरफटका माराल, अशी अपेक्षा होती. मात्र, तुम्ही वातानुकूलित दालन सोडलेच नाही. लोकच स्वच्छता मोहीम हाती घेत आहेत, तरीही मनपाचे अधिकारी हातात झाडू घेऊन फिरताना दिसत नाहीत. पाणीपुरवठा व्यवस्था समांतरच्या ठेकेदाराकडे सोपवून निर्धास्त झालात. शहराच्या अनेक भागांत आजही पाण्याची ओरड आहे. त्यामागील कारणे शोधून काढणे तुम्ही टाळले. अनेक रस्त्यांची चाळणी झाली आहे. खड्ड्यांतून वाट काढता काढता लोक मेटाकुटीला आले आहेत. त्यासाठी युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेण्याऐवजी ठेकेदारांची बिले दिल्यावर खड्ड्यांचे काम हाती घेऊ, अशी उत्तरे िदली जात आहेत. ठेकेदारांना दात पाडून देऊ का, असेही वक्तव्य तुम्ही केले. त्यामुळे तर औरंगाबादकरांना दहा फूट खोलीच्या खड्ड्यात पडल्याचा ह्यआनंदह्ण मिळाला. महापालिका खड्डे बुजवत नसल्याने अगतिक झालेल्या लोकांनीच त्यासाठी पुढाकार घेतला, तरीही तुम्हाला त्याचे सोयरसुतक नाही. सिग्नल्स सुरू करण्यासाठीही तुम्ही नवनवी कारणे पुढे करता. तुम्हीच तुमच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या नाही, तर लोकांनी काय करावे अशी तुमची अपेक्षा आहे, आणखी किती दिवस मनपा प्रशासन औरंगाबादकरांच्या संयमाची परीक्षा पाहणार आहे?
राजेंद्रसिंह महोदय, तुम्हीही एक संवेदनशील अधिकारी असल्याची ख्याती आम्ही ऐकली होती. कार्यभार स्वीकारल्यावर तुम्ही त्याचे काही प्रमाणात प्रत्यंतरही आणून दिले होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मुख्य जबाबदारी पार पाडताना पोलिस ठाण्यात सामान्य नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जाईल, असे तुम्ही म्हटला होतात. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. आजही अनेक ठाण्यांत तक्रारकर्त्यालाच आरोपीसारखी वागणूक िदली जात आहे. सामान्य नागरिकांना प्रचंड त्रासदायक ठरणाऱ्या वाहतूक नियंत्रणाचे काम गांभीर्याने होत नाही. काही चौकांमध्ये, रस्त्यांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. दुसरीकडे वाहतूक पोलिस परप्रांतातील ट्रक, चारचाकींनाच लक्ष्य करत आहेत. बंद सिग्नल सुरू करण्यासाठी महापालिकेवर दोषारोप करण्यापलीकडे काहीही होत नाही. वाहतूक नियंत्रणासाठी स्काऊट, एनसीसीच्या विद्यार्थ्यांची मदत घेणे बंदच झाले आहे. वाहतूक पोलिसांच्या मदतीला धावून जाणाऱ्या माजी सैनिकांनाही कायद्याकडे बोट दाखवून अडवले जात आहे. आपण दोघेही सुसंस्कृत आणि प्रशासकीय कारभारावर नियंत्रण असलेले अधिकारी म्हणून ओळखले जातात, तरीही तुमच्या कामकाजाची पद्धत पाहून कुठे नेऊन ठेवले आमचे औरंगाबाद, असा प्रश्न विचारावासा वाटतो. पत्रातील काही शब्द तिखट असले, तरी ते नागरिकांच्या भावना व्यक्त करणारे आहेत. त्याची योग्य दखल घेऊन तुम्ही एक आदर्श शहर निर्माण करण्यासाठी पाऊल उचलाल, अशी अपेक्षा आहे.
आपला
एक औरंगाबादकर