आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एलआयसी बोनसचे ‘जीवन’धोक्यात; ग्राहकांवर पडणार कराचाही भार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एलआयसी आणि खासगी विमा कंपन्यांना स्पर्धेसाठी समान वातावरण तयार करण्याच्या धोरणाखाली एलआयसीच्या विमा पॉलिसीज नव्या रूपात येणार असून त्यामुळे ग्राहकांना मिळणारा बोनस कमी होण्याची भीती आहे. शिवाय प्रीमियम वाढणार तो वेगळाच. येत्या 1 ऑक्टोबरपासून एलआयसी आणि खासगी विमा कंपन्यांच्या पॉलिसीज जवळपास सारख्याच राहणार असल्याने ग्राहकांच्या खिशावर आता भार पडणार आहे.

आयआरडीए अर्थात विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवणार्‍या प्राधिकरणाने विमा क्षेत्रातील सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यातून 83.24 टक्के बाजार हिस्सा असणार्‍या एलआयसीला 16.71 टक्के बाजार हिस्सा असणार्‍या 24 खासगी कंपन्यांशी स्पर्धा करताना आपल्या पॉलिसीमध्ये बदल करावे लागत आहेत.

विमा क्षेत्रात खासगी कंपन्या दाखल होऊन दशक उलटले असले तरी त्यांना म्हणावा तसा व्यवसाय काबीज करता आलेला नाही. राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असणार्‍या या कंपन्यांना एलआयसीसोबत स्पर्धा करताना येणार्‍या अडचणी ध्यानात घेऊन आणि बाजारपेठेवर कुणा एकाचीच मक्तेदारी राहू नये या जागतिकीकरणातील धोरणानुसार विमा क्षेत्रात सुधारणा केल्या जात आहेत. त्याचा फटका बसणार आहे, असे एलआयसीचे अधिकारी मान्य करीत नसले तरी ग्राहकांना पर्याय उपलब्ध होणार आहेत.

1 सप्टेंबरपासून विमा सप्ताह
एलआयसीच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 सप्टेंबरपासून विमा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आज एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक प्रशांत नायक म्हणाले की, एका दशकाच्या स्पर्धेनंतरही एलआयसीने आपले अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे. एलआयसीने आपल्या व्हिजन 2020 मध्ये प्रत्येक खिशात एक पॉलिसी, सूक्ष्म विमा आणि गावोगाव मिनी ऑफिस हे धोरण ठेवले आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, बीड व उस्मानाबाद या चार जिल्हय़ांत 5 मिनी ऑफिसेस सुरू झाली असून सप्टेंबरपर्यंत आणखी 4 कार्यालये सुरू करण्यात येतील. शिवाय यंदापासून विभागातील 85 शाळांतील प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांना स्टुडंट ऑफ द इयर पुरस्कार देण्यात येणार आहे. विमा व्यवसायात सामाजिक जबाबदारी म्हणून हे उपक्रम हाती घेण्यात आले, असे ते म्हणाले. या वेळी विक्री व्यवस्थापक प्रदीप नांदगावकर, विपणन व्यवस्थापक दिवाकर मित्तल उपस्थित होते.

काय होणार बदलांमुळे?
सध्या एलआयसीच्या 52 योजना बाजारात आहेत. नवजात बालकापासून 85 वर्षांच्या वृद्धापर्यंत सर्वांना विमा उतरवता येणार्‍या या योजना आहेत. कमी प्रीमियम आणि बोनस व चांगला परतावा अशा योजनांमुळे एलआयसी बाजारपेठेत नंबर वनवर आहे. या योजना आता बंद होतील. 1 ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने नव्या योजना दाखल होणार असून एलआयसी आणि खासगी कंपन्यांच्या सगळय़ा योजना आता सारख्याच असतील. शिवाय आतापर्यंत एलआयसीच्या ग्राहकांना सेवाकर द्यावा लागत नसे. पण आता तो द्यावा लागेल. म्हणजे 10 हजार रुपये प्रीमियम असेल तर आता 10 हजार अधिक सेवाकर अशी रक्कम ग्राहकाला भरावी लागणार आहे. शिवाय बोनस देण्याचा प्रकार बंद होण्याची शक्यता अधिक आहे. या बोनसवरच एलआयसीच्या पॉलिसीजवर ग्राहकांना अतिरिक्त आर्थिक लाभ मिळत असे. यापुढे 1 ऑक्टोबरनंतर घेतलेल्या पॉलिसीजना बोनस न मिळण्याची शक्यता असली तरी त्याआधी घेतलेल्या पॉलिसीजना बोनस मिळणारच आहे. आगामी काळात मोबाइलसारखी इन्शुरन्स पोर्टेबिलिटी येणार असून एखाद्या कंपनीची सेवा न आवडल्यास दुसर्‍या कंपनीकडे ती वळवता येईल.

एलआयसी म्हणते, फरक पडणार नाही
वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक प्रशांत नायक ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाले की, स्पर्धेचा एलआयसीला मुळीच धोका नाही. उलट 2001 मध्ये आमचा बाजार हिस्सा 53 टक्के असताना नंतरच्या स्पर्धेच्या काळात आम्ही 83 टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे आमच्या 12 लाख एजंटांच्या जाळय़ाच्या जोरावर आम्ही या स्पर्धेतही निश्चितच आपला अव्वल क्रमांक टिकवून ठेवू शकतो. त्यासाठी आम्ही एजंटांना नव्या योजनांबाबत प्रशिक्षणही देत आहोत. ग्राहकांचा विश्वास ही आमच्यासाठी जमेची बाजू आहेच.