आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Life After Monsoon Rain And Land Sliding In Uttrakhand Aurangabad Pilgrims

महाप्रलयातून 33 भाविक सुखरूप परतले; आप्तेष्टांना पाहून फुटला भावनांचा बांध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सोनप्रयाग ते सीतापूर असे आठ ते दहा किलोमीटरचे अंतर कापताना गंगेचे अक्राळविक्राळ रूप पाहायला मिळाले. 30 ते 40 फूट उंच लाटा जेव्हा माणसे, गगनचुंबी इमारती आणि वाहनांना आपल्या कवेत घेत होत्या तेव्हा आपणही या जगाचा निरोप घेणार असे वाटले; परंतु परमेश्वर आपल्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असा विश्वास असल्याने महाप्रलयातून सुखरूप बचावल्याचा व अंगावर शहारे आणणारा अनुभव शहरातील अशोक अतकरे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितला.

शहरातील अतकरे, पाटील, चव्हाण, पवार कुटुंबीयांतील 17 सदस्य चार धामच्या यात्रेसाठी आठ जूनला गेले होते; परंतु केदारनाथला न जाता त्यांनी सोनप्रयागहूनच परत फिरण्याचा निर्णय घेतल्याने ते महाप्रलयातून वाचले. उत्तराखंड येथून परतलेल्या भाविकांचे गुलाबपुष्प देऊन विमानतळावर स्वागत करण्यात आले. अतकरे म्हणाले, 15 जूूनला गंगोत्रीचे दर्शन झाले. 16 तारखेला सोनप्रयाग येथे होतो. त्याच दिवशी ढगफुटी झाली. जोरदार पाऊस सुरू असल्याने सर्वांच्या अंघोळी आटोपण्यासाठी दोन तास उशीर झाला. पोलिसांनी रस्त्यातून परत पाठवले. आम्ही सीतापूरच्या दिशेने परतण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी दोन तास उशीर झाल्यामुळे सर्वांचे प्राण वाचल्याचे ते म्हणाले. सीतापूरला जाण्यासाठी काहीही वाहन नसल्याने मिळेल ते खात सात-आठ तास डोंगरदर्‍यांतून प्रवास करावा लागला. आयुष्यात पहिल्यांदाच उंच लाटा पाहिल्या. त्या लाटा माणसे, इमारती, गाड्यांना आपल्या कवेत घेत होत्या. हे पाहताना आपले काही खरे नाही, असे वाटले. जीव मुठीत धरून ऋषिकेश व हरिद्वारहून शहरात परतल्याने सुटकेचा नि:श्वास टाकल्याचे अतकरे म्हणाले. दरम्यान, सोनार कुटुंबाच्या आठ सदस्यांपैकी दोन महिला, चार मुले हरिद्वारला सुखरूप असून उर्वरित दोन पुरुषांना रात्रीपर्यंत गुप्तकाशीहून हरिद्वारला आणण्यात येणार आहे.

यांचे झाले आगमन
चार धाम यात्रेसाठी गेलेले भगवान आणि मंगला पवार, अशोक आणि सुरेखा अतकरे, कल्याण पाटील आणि त्यांची पत्नी, मंगला खडके, तुलसीदास चव्हाण आणि त्यांची पत्नी, एल. डी. पाटील आणि त्यांची पत्नी, बहीण, मुलगी आणि दोन नाती शहरात परतले आहेत, तर आनंदा कुंटे, वैशाली कुंटे, लक्ष्मी कुंटे, अंजली कुंटे, पवन कुंटे, तारा सपकाळ, सुभाष गिरी, ममता गिरी, आदित्य गिरी, आदिता गिरी, डॉ. अनंत कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हे भाविक सचखंड एक्स्प्रेसने शहरात दाखल झाले.

झंवर कुटुंबीयांची चिंता वाढली
राजेश झंवर, विनोद लाहोटी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 12 सदस्य केदारनाथला गेले होते. राजेश झंवर बेशुद्धावस्थेत सैन्य आणि पोलिसांच्या बचाव पथकाला सापडले. उर्वरित सदस्य अद्याप बेपत्ता आहेत. राजेश झंवर तसेच दयानंद आणि मधुमालती भालेराव यांना सैन्याच्या वाहनातून ऋषिकेशला आणण्यात येणार आहे.

16 भाविक रेल्वेने दाखल
गेले सहा दिवस मृत्यूशी झुंज देऊन 16 भाविक शनिवारी सचखंड एक्स्प्रेसने रेल्वेस्थानकावर दाखल झाले. नातेवाईक पाहून अनेकांच्या आर्शूंचा बांध फुटला.

मनसेकडून स्वागत
भाविकांचे मनसेच्या पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी रेल्वेस्टेशनवर स्वागत केले. मनसेने सुरू केलेल्या हेल्पलाइनवर दिवसभरात सुमारे 200 नागरिकांनी आप्तेष्टांची चौकशी केली. या वेळी शहराध्यक्ष डॉ. शिवाजी कान्हेरे, अरविंद धीवर, सतनामसिंग गुलाटी, वैभव मिटकर, गणेश जगधने, ज्ञानेश्वर कुंटे, भास्कर गाडेकर यांची उपस्थिती होती.