आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठे अपघात टळले, पेटलेली सिलिंडर्स रस्त्यावर फेकली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/वाळूज - शहर आणि वाळूज परिसरात सिलिंडर्सनी पेट घेतला; परंतु प्रसंगावधान राखल्यामुळे दोन मोठे अपघात टळले, तर चिश्तिया चौकातील हॉटेल गझलमध्ये आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. शहरातील मकई गेट आणि वाळूजमधील समता कॉलनीत पेट घेतलेले घरगुती सिलिंडर रस्त्यावर फेकल्यामुळे या घटना टळल्या. मात्र, नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली होती.

मकई गेट येथील नसीम खान यांच्या घरातील सिलिंडरमधून गॅस गळती होत असल्याने त्यांनी दुपारी एक वाजता सिलिंडर रस्त्यावर आणून फेकले. त्यानंतर थोड्याच वेळात सिलिंडरने पेट घेतल्यामुळे दुपारी अर्धा तास बेगमपुरा-मकई गेट रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशमन विभागाने घटनास्थळावर धाव घेत पाच मिनिटांत सिलिंडरची आग विझविली. ड्यूटी इन्चार्ज एस. के. भगत, मोहन मुंगशे, एस. ई. भोसले, अशोक वाघ यांनी ही आग विझविली. रस्त्यावर दुतर्फा बघ्यांची गर्दी जमली होती. वाहनधारकांनाही या रस्त्यावरून काही काळ वाहने नेण्यास भीती वाटत होती. सिलिंडरचा स्फोट झाला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती. बेगमपुरा पोलिसांचे पथक सिलिंडरमधील आग विझल्यानंतर घटनास्थळावर आले. मात्र, त्यांनी नसीम खान यांना तंबीही दिली नाही किंवा सिलिंडरही जप्त केले नाही. रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.

स्वयंपाक सुरू असताना पेटले
वाळूजमधील समता कॉलनीतील धर्मेंद्र टोमके यांच्या घरात सकाळी आठच्या सुमारास गॅस सिलिंडरमधून गळती सुरू झाली. त्यानंतर सिलिंडरने पेट घेटला. मात्र, टोमके यांनी पेटता सिलिंडर उचलून बाहेर फेकला. त्याच स्थितीत सिलिंडर पेटून त्यातील सर्व गॅस जळाल्याने ते रिकामे झाले. दरम्यान, ही माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी अग्निशमन दलाला बोलवले. मात्र, तोपर्यंत आग आटोक्यात आली होती. घटनेची वाळूज पोलिसांनी नोंद घेतली.

बघ्यांची गर्दी
चिश्तिया चौकातील हॉटेल गझलमध्ये शनिवारी पहाटे चार वाजता आग लागली. ही आग कर्मचाऱ्यांनी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; पण वायरिंग जळून खाक झाली. रस्त्यावर बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. पहाटे पोलिसांनी याची नोंद घेतली असल्याची माहिती हॉटेलमालक शिवकुमार जैस्वाल यांनी दिली.