औरंगाबाद - देशात सध्या स्वयंपाकासाठी सर्वाधिक वापर लिक्विड पेट्रोलियम गॅस अर्थात एलपीजीचा होत असला तरी १५ टक्के लोक आजही स्वयंपाकासाठी सरपणाचा वापर करतात. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेने (एनएसएसओ) केलेल्या ताज्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. रोजच्या स्वयंपाकासाठी पुरेशी व्यवस्था नसणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. स्वयंपाकाची पुरेशी व्यवस्था नसणारे ३.८ टक्के लोक महाराष्ट्रात आहेत, त्याखालोखाल आंध्रप्रदेशात २.८ टक्के लोक आहेत.
ग्रामीण भागात दहा वर्षांपूर्वी स्वयंपाकाची कसलीही व्यवस्था नसणाऱ्यांचे प्रमाण ०.७ टक्के होते. ते २०१२ मध्ये १.३ टक्क्यांवर पोहोचले आहे. शहरी भागात कर्नाटकात १३.९ टक्के, तामीळनाडूत ९.२ टक्के तर आंध्रप्रदेशात ९.१ टक्के लोकांकडे स्वयंपाक करण्याची कसलीही व्यवस्था नाही.