आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Liquor News In Marathi, Divya Marathi, Aurangabad, DMIC

वर एसी अन् खाली देशी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डीएमआयसी प्रकल्पामुळे भरपूर पैसा आलेल्या करमाड गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर दुर्गालाल जैस्वाल याची तीन मजली इमारत आहे. या इमारतीत वरच्या मजल्यार एसी बार आहे. दुस-या मजल्यावर बिअर शॉपी आहे, तर खालच्या मजल्यात चक्क देशी दारूचे दुकान आहे. असा त्रिवेणी संगम फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो. औरंगाबाद-जालना रोडला लागूनच ही इमारत असल्याने मद्यपी दुकानातून थेट रस्त्यावर येतात. दारूच्या दुकानालगत हातपंप असल्याने महिला पाणी भरण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांना या नशेतील मद्यपींचा सामना करावा लागतो. गेल्या 35 वर्षांपासून दारू दुकानांचा हा त्रास आहे. गावक-यांनी उत्पादन शुल्क विभागापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत खेटा घातल्या. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही.


ग्रामसभेत तीन ठराव
दारू दुकान गावातून हटवण्याची मागणी ग्रामस्थांनी अनेक वेळा केली. शेवटी गावक-यांचा संताप बघून ग्रामसभेने ठराव घेण्याचा निर्णय घेतला. सुमारे 600 नागरिकांसमवेत 15 ऑगस्ट 2011 रोजी पहिला ठराव सरपंच कांताबाई मुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला, पण या ठरावाला उत्पादन शुल्क विभागाने केराची टोपली दाखवली. त्यानंतर ग्रामसभेने 21 ऑगस्ट 2012 रोजी व त्यानंतर 26 जानेवारी 2013 रोजी असे आणखी दोनदा ठराव घेतले, पण याचाही काही फायदा झाला नाही. ग्रामसभेच्या ठरावाचा संबंध नसल्याचे सांगत उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी हात वर केले. परिणामी, गेल्या चार वर्षांपासून करमाड येथील ग्रामस्थ हा लढा देत आहेत.


येथे येतो संशय
ग्रामसभेत झालेला पहिला ठराव योग्य पद्धतीने घेतला गेला नाही. बाटली आडवी करण्यासाठी ग्रामसभेत योग्य पद्धतीने नियम व कायद्याचे पालन करून ठराव घ्यावा लागतो. ठरावाच्या सभेला बीडीओ, उत्पादन शुल्क विभागचे निरीक्षक, ग्रामपंचायतीचे किमान एक तृतीयांश सदस्य आणि सभेची पूर्ण व्हिडिओ शूटिंग करणे बंधनकारक आहे. ग्रामसेवक व सरपंचांना या पद्धतीने ठराव घेण्याचा व पत्रव्यवहार करण्याच्या सूचना देऊनही नियमाचे पालन केले जात नाही. केवळ औपचारिकरीत्या उठसूट ठराव घेण्याचा सपाटा ग्रामपंचायत लावत आहे. त्यामुळे यात ग्रामपंचायत सदस्यच घोळ घालत असावेत असा संशय आहे.


अपघातांचा धोका
नियमानुसार महामार्गावर दारू दुकानाला परवानगी नाही. हे दुकान औरंगाबाद-जालना रोडला लागूनच आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत हा नियम लागू नाही. त्यामुळे तीन मजली दारू दुकानाला संरक्षण मिळते. मात्र दारुडे झिंगत थेट रोडवर येत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.


आंदोलन आणि आश्वासन
या सर्व घटनांमुळे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून सरपंच कांताबाई मुळे यांनी ग्रामसभेचा ठराव घेतला. 15 दिवसांत दारूच्या दुकानाचे स्थलांतर झाले नाही, तर रास्ता रोको करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला होता. महिलांपुढे दारू विके्रते दुर्गालाल जैस्वाल यांनी माघार घेत 5 महिन्यांत दुकान हलवण्याचे आश्वासन 22 नोव्हेंबर 2013 रोजी सभेत दिले होते, परंतु अद्याप दुकान हलवलेले नाही. दारूचे दुकान बंद होण्यासाठी ग्रामस्थ पुढाकार घेतात, मात्र नियमाआड त्याला संरक्षण देण्याचा अधिकारी आणि ग्रामपंचायतीचा प्रयत्न असल्याचा संशय निर्माण होतो.


थेट सवाल
आर. चौधरी
अधिकारी, उत्पादन शुल्क विभाग
आपण करमाड येथे एकाच छताखाली तीन मद्य विक्रेत्यांना परवाने दिले?
- हे प्रकरण माझ्याआधीचे आहे, परंतु एका छताखाली तीन मद्य विक्रीचे परवाने नियमानुसार देता येतात. यासाठी वेगळा नियम नाही.
तीन वेळेस ग्रामसभेत ठराव होऊनही कारवाई का होत नाही?
-आम्हाला तीन ठराव दिले गेले. मात्र, ग्रामसभेने हे ठराव योग्य पद्धतीने म्हणजे नियमानुसार घ्यायला हवे होते. तशा सूचनाही आम्ही ग्रामपंचायतीला केल्या होत्या; पण त्याचे पालन झाले नाही.
त्या सूचना नेमक्या काय होत्या?
दारूबंदीविरोधी सभा घेत असताना सभेत बीडीओ, दारूबंदी खात्याचे निरीक्षक व सर्व सदस्यांची उपस्थिती असावी लागते. शिवाय या सभेचे पूर्ण चित्रीकरण होणे गरजेचे आहे, परंतु अशा कुठल्याच नियमांचे पालन सभेने केले नाही. त्यामुळे बाटली आडवी करण्यासाठी निवडणूक घेण्यास समस्या निर्माण होत आहेत. आम्ही सर्व प्रकारचे पत्रव्यवहार केले, परंतु वारंवार सभा घेतल्या जातात, पण त्यात नियमांचे पालन मात्र होत नाही.


थेट सवाल
कांताबाई मुळे
सरपंच, करमाड
नियमानुसार ठराव न घेतल्याने दारूबंदी विभाग कारवाई करत नाही...
बरोबर आहे. अगोदर आम्हाला या गोष्टी माहिती नव्हत्या. सर्व संमतीने सुरुवातीला दोन ठराव घेतले आणि मग खरी प्रक्रिया कळाली.
विशेष ठराव आपण कधी घेणार आहात?
मागील सभेत दुकानदार दुर्गालाल जैस्वाल यांनी सभेत दुकान हटवण्यासाठी 5 महिन्यांचा कालावधी मागितला होता. त्याला अजून काही वेळ बाकी आहे. मुदतीत त्यांनी दुकान हटवले तर ठीक, अन्यथा रीतसर ठराव घेऊन दुकान हटवू.
तुम्ही जाणूनबुजून नियमानुसार ठराव घेत नसल्याचा आरोप होतो आहे...
तसे अजिबात नाही. आम्ही जनतेच्या बाजूनेच आहोत. त्यामुळे दुकान हटवणारच.


मद्यपींचा उच्छाद
मद्यपींचा इतका उच्छाद होतो की, आमच्या घरावर बाटल्या फेकून मारतात. आम्ही त्रस्त झालो आहोत.
ज्योती खंडाळे, ग्रामस्थ


दुकानासमोरून जावे लागते
जवळच ग्रामीण रुग्णालय व शाळा आहे. या ठिकाणी जाण्यासाठी दारूच्या दुकानासमोरून जावे लागते. तळीरामांच्या त्रासामुळे जाणे-येणे अवघड झाले आहे.
पद्माबाई डोंगरे, ग्रामस्थ


जैस्वाल नॉट रिचेबल : दुकानाचे मालक दुर्गालाल जैस्वाल यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.