आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध दारूविक्रेत्यांची पोलिसांना मारहाण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोड - देशी दारूची अवैध विक्री रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांना कोळी बोडखा येथे मारहाण झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
कोळी बोडखा येथील पंचायत समिती सदस्य महादेव ठोके याचा चुलता विष्णू ठोके हा अवैधरीत्या देशी दारूचा धंदा करत असल्याची माहिती पाचोड पोलिस ठाण्याचे जमादार निकाळजे व पोलिस नाईक विनोद पद्मने यांना मिळाली. त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून दोन पंचांसमक्ष घराची झडती घेण्यास सुरुवात केली असता विष्णू ठोके याने पंचांसह पोलिसांना शिवीगाळ सुरू केली. याच वेळी पंचायत समिती सदस्य महादेव ठोके, विलास ठोके, कैलास ठोके, अंकुश ठोके, विष्णू ठोके, चतुर्भुज ठोके, लहू ठोके, बाबासाहेब वैद्य यांनी गणवेशधारी पोलिसांना मारहाण केली. या मारहाणीत नाईक पद्मने यांच्या ओठाला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी विलास ठोके व विष्णू ठोकेच्या मुलास पाठलाग करून अटक केली. या सर्व आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध धंदे फोफावले - पाचोडसह आडूळ, विहामांडवा, दावरवाडी, नांदर, कडेठाण या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध धंदे फोफावले असून पोलिसांची जरब कमी झाल्याने या धंदेचालकांची हिंमत पोलिसांना मारहाण करण्याएवढी वाढली आहे. कर्तव्यदक्ष म्हणून ओळख असलेले सहायक पोलिस निरीक्षक पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारलेले द्वारकादास चिखलीकर या अवैध धंद्यांना चाप लावतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चिखलीकर यांनी या अवैध धंदेचालकांविरुद्ध मोहीम हाती घेणार असल्याचे सांगितले.