आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐकले का ! आता आपली दुचाकी एलपीजी वर धावणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दिवसेंदिवस पेट्रोलचे दर वाढत असल्याने सामान्यांना दुचाकी चालवणे कठीण होत आहे. महागाईच्या दिवसांत जालन्याच्या मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संशोधक विद्यार्थ्यांनी एलपीजी गॅसवर चालणार्‍या मोटारसायकलचा शोध लावला आहे. हे मॉडेल यशस्वी झाले तर सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षात शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या यंत्राची चाचणी अभियांत्रिकी महाविद्यालयात घेण्यात आली. एलपीजीवर चालणार्‍या गाडीची संकल्पना प्रशांत अप्पासाहेब नाईक या विद्यार्थ्यांनी मांडली व संभाजी दिनकर हिंदुळे, योगेश शंकरराव धोरण, किरण बाबासाहेब आमले, संध्या पाटील या सर्वांनी मिळून अनोखी मोटारसायकल तयार केली. अभियांत्रिकीचे प्रशिक्षण घेताना विविध कल्पना आणि संशोधनांचा वापर करावा लागतो. शिक्षण घेत असताना केले जाणारे हे प्रयोग भविष्यात समाजोपयोगी व्हावे या उद्देशाने उचललेले हे पाऊल आहे, असे प्रशांत नाईक यांनी सांगितले. प्रदूषण वाढणार नाही ही काळजी घेण्यात आली आहे. या प्रयोगाच्या यशस्वितेसाठी प्रा. रवींद्र करवंदे, प्रा. इमरान कुरैशी, प्रा. मोहंमद इरफान, प्रा. शिवाजी परिहार, प्रा. हर्षल चव्हाण, प्रा. गुणवंत शेळके यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार अँड. अंकुशराव टोपे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, प्राचार्य अर्चना ठोसर यांनी अभिनंदन केले आहे.

अशी होईल बचत
एक लिटर पेट्रोलसाठी सरासरी 70 रुपये मोजावे लागतात. तयार करण्यात आलेल्या दुचाकीमध्ये 40 रुपयांचा एक के. जी. एलपीजी गॅस भरल्यास ती 120 किलोमीटर धावते. त्यामुळे 30 रुपयांची बचत होऊ शकते.

असा होईल फायदा
गॅसवर चालणार्‍या या मोटारसायकलमुळे वायू प्रदूषण कमी होईल. पैसे आणि पेट्रोलची बचत होईल. पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत मिळेल.

असा आहे प्रयोग
मोटारसायकलच्या काबरेरेटरमध्ये एक छोटा व्हॉल्व्ह बसवण्यात आला आहे. त्यामुळे एलपीजी एअर मिक्स होऊन इंजिनला पुरवठा करते आणि दुचाकी धावू लागते.

सुरक्षेसाठी उपाय : एलपीजीवर चालणार्‍या या गाडीच्या सुरक्षेसाठी गाडीचा स्पीड 50 पर्यंत ठेवण्यात आला आहे. यामुळे नियंत्रणही राहते. तसेच जर गाडीचा स्पीड ठरवलेल्या क्षमतेपेक्षा वाढवण्याचा प्रयत्न केला तर गाडीचे इंजिन बंद होते.

प्रयोगासाठी लागलेला कालावधी : हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी 2 महिने लागले. किट बनवण्यासाठी 7 हजार रुपये खर्च लागला.

पुढे काय : एलपीजी गॅसवर गाडी चालवण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याने आता सीएनजीसाठी प्रयत्न सुरू आहेत.