आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीदीला भेटण्यासाठी धावला अन्...शालेय वाहनाखाली चिरडला चिमुरडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमिताभ) - Divya Marathi
(अमिताभ)
औरंगाबाद- दीदी आली, दीदी आली...असे म्हणत चिमुकला अमिताभ धावत घराबाहेर आला अन् काही क्षणातच त्याची करुण किंकाळी ऐकू आली. ज्या बहिणीच्या स्वागतासाठी तो धावला होता तिच्यावरच त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहण्याची वेळ आली. निचेष्ट पडलेल्या मुलाला उचलताना आई-वडिलांचे काळीजही फाटून गेले. मुलीला घेऊन आलेल्या मिनीडोरच्या धडकेनेच त्या चिमुकल्याचे प्राण घेतले होते. २३ जून रोजी सायंकाळी साताऱ्यातील पेठेनगरातील पंडित कुटुंबावर हे संकट कोसळले.
स्टेट बँक ऑफ हैदराबाद बँकेत व्यवस्थापक असलेले परिमल गौतम पंडित यांना एक मुलगी एक मुलगा. मुलगी खुशी ७, तर मुलगा अमिताभ वर्षांचा. बीड बायपास येथील एलोरा स्कूलमध्ये अमिताभने नुकताच प्रवेश घेतला होता.
तो सकाळच्या तर खुशी दुपारच्या सत्रात शाळेत जात होते. मुलीला शाळेत घेऊन जाण्यासाठी आणि परत आणून सोडण्यासाठी पंडित यांनी मच्छिंद्र कोटिये यांची टाटा विंगर (मिनीडोर एमएच २० सीटी ९६७५) लावली होती. दररोज सायंकाळी खुशी घरी येण्याची चाहूल लागताच अमिताभ आनंदाने नाचत तिच्या स्वागतासाठी जात असे. २३ जूनची सायंकाळ मात्र विचित्र ठरली. नेहमीप्रमाणे टाटा विंगरचा आवाज येताच अमिताभ लाडक्या बहिणीच्या स्वागतासाठी घराबाहेर धावत आला. तोच भरधाव वेगाने येत असलेल्या टाटा विंगरने त्याला जोरदार धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. पंडित कुटुंबाने अमिताभला तातडीने बजाज रुग्णालयात हलवले; परंतु त्याची प्रकृती झपाट्याने खालावत होती.
डोक्याला जबर मार लागला होता. म्हणून त्याला घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. तोपर्यंत त्या चिमुकल्याचा प्राण गेला होता. या प्रकरणी परिमल पंडित यांच्या तक्रारीवरून मच्छिंद्र कोटियेविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास जमादार चव्हाण करत आहेत.
अटेंडंट असता तर...
काहीच चूक नसताना माझा मुलगा गेला. खरे तर टाटा विंगरमध्ये शाळेचा अटेंडंट (सहायक) असता तर ही दुर्घटना टळली असती. गेल्या काही दिवसांपासून शालेय वाहतुकीचे नियम कडक व्हावे याकरिता पोलिस आयुक्त अमितेशकुमार खूप प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याला हवा तसा प्रतिसाद वाहनचालक, शाळांकडून मिळताना दिसत नाही, असे सांगताना परिमल यांना रडू कोसळले.