आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत गाडीखाली चिरडून चिमुकलीचा अंत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गजबजलेल्या टीव्ही सेंटर चौकात ‘कॅप्टिव्हा’ ही एसयूव्ही कार शिकणार्‍या सय्यद बिलाल (17) या किशोरवयीन मुलाने काकांसोबत देवदर्शनासाठी जाणार्‍या नाव्या प्रकाश सोनवणे (3) या चिमुकलीला चिरडले. हा भीषण अपघात सकाळी 8.15 वाजता झाला. गाडीची धडक इतकी जोरदार होती की, त्यामुळे नाव्या हवेत फेकली गेली.

गाडीखाली चिरडून तिचा अंत झाला. तिचे काका शिरीष व बहीण सायली (5) जखमी झाले. बिलाल हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे (राज्य) अध्यक्ष आणि माजी नगरसेवक कदीर मौलाना यांचा धाकटा मुलगा आहे.

अपघातानंतर घटनास्थळावर संतप्त जमावाने गाडीवर (एमएच 21 व्ही 501) दगडफेक करून तिला उलथून टाकले. हा गोंधळ तासभर सुरू होता. पोलिस येताच जमाव पांगला. या प्रकरणी बिलालला ताब्यात घेतले असून त्याच्या शेजारी बसलेला चालक मोहंमद अमर चाऊस याला अटक केली आहे. परवान्याशिवाय वाहन चालवल्यामुळे सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कदीर मौलाना यांना विमानतळावर सोडून चालक अमर चाऊस व बिलाल सेंट्रल नाक्यावर आले. तेथून बिलालने गाडी चालवू देण्याचा आग्रह धरला. आझाद चौकमार्गे ते टीव्ही सेंटरकडे गेले. चौकातून शरद टी पॉइंटकडे जाण्यासाठी बिलालने गाडी वळवली. त्याच वेळी त्याचा ताबा सुटला. या वेळी शिरीष, सायली व नाव्या समोरून पायी येत होते. गाडी आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून शिरीषने सायलीला रस्त्याच्या कडेला ढकलले. नाव्याला वाचवण्याचाही त्यांनी आटोकाट प्रयत्न केला; पण भरधाव गाडीने नाव्याला चिरडले. या धडकेने नाव्या लांबवर फेकली गेली. शिरीष व सायलीही जखमी झाले. नाव्या व सायलीला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, नाव्याने अपघातस्थळी प्राण सोडला होता. पुढे जाऊन बिलालने एका दुचाकीस्वारालाही ठोकरले. नाव्याचे वडील प्रकाश हे चिकलठाणा एसआयडीसीत कंपनीत कामगार आहेत.

बिलालचा वाढदिवस
अपघात करणा-या बिलालचा मंगळवारी (16 एप्रिल) 17 वा वाढदिवस होता. त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. तो अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.


शेकडोंचा जमाव; गाडीची प्रचंड तोडफोड
अपघात झाल्यानंतर तेथे शेकडो लोक जमा झाले. जमाव नियंत्रणाबाहेर गेला होता. संतप्त लोकांनी ‘कॅप्टिव्हा’ गाडीवर प्रचंड दगडफेक केली. सर्वांनी मिळून गाडी उलथवून टाकली. अपघात घडल्यानंतर बिलाल व गाडीचा चालक चाऊस व शिरीष यांनी तातडीने नाव्या व सायलीला एमजीएम रुग्णालयात नेले. त्यांच्यापाठोपाठ अनेक जण एमजीएमकडे गेले व त्यांनी बिलाल व चाऊसला मारहाण केली. त्यानंतर सिडको पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.