आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीत सात वर्षांनंतर प्रथमच दिसला लिटिल टर्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पक्षी निरीक्षणादरम्यान एशियन ओपनबील स्टॉर्क - Divya Marathi
पक्षी निरीक्षणादरम्यान एशियन ओपनबील स्टॉर्क
औरंगाबाद- देशभरातील किनारपट्टीवर आढळणाऱ्या लिटिल टर्न या आकर्षक पक्ष्याने सोमवारी पक्षिप्रेमींचे लक्ष वेधले. डोक्यावर टोपी घातल्यागत दिसणारा हा पक्षी तब्बल सात वर्षांच्या कालखंडानंतर पाहून पक्षिप्रेमी भारावले.

जायकवाडीतील अनेक पक्षी आता प्रजननाच्या तयारीत असून काहींना पिल्ले झाली आहेत, तर ब्लॅक टेल्ड गॉडविट पिल्ले देण्यासाठी सैबेरियाला रवाना होत आहेत. पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक म्हणून पक्षी ओळखले जातात. अन्नसाखळीचे रक्षण करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मात्र, हवामानातील बदल, वाढते शहरीकरण, वृक्षतोड, जंगलतोड यामुळे शहरी भागातून पक्षी नाहीसे झाले आहेत. ही बाब ओळखून एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशनल अकॅडमीच्या वतीने खास पक्षी निरीक्षणाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत सोमवारी पक्षिप्रेमींसाठी जायकवाडी पक्षी अभयारण्यात पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. पहाटे ६.३० ते ९.३० दरम्यान आयोजित कार्यक्रमात पक्षिप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप यार्दी यांनी या वेळी मार्गदर्शन केले. याप्रसंगी अमेय देशपांडे, ओंकार सराफ, प्रसाद गुरू, श्रवण परळीकर यांची उपस्थिती होती. 

लिटिल टर्नने वेधले लक्ष 
पक्षीनिरीक्षणादरम्यान ब्लॅक हेडेड आयबीस, रेड नॅपेड आयबीस, ओपन बिल्ड स्टॉर्क, लिटिल कॉरमोरेंट्स, वुली नेक्ड स्टॉर्क, इग्रिट्स, हेरॉन्स आणि टर्न्सचा आदी पक्ष्यांनीही लक्ष वेधल्याचे डाॅ.दिलीप यार्दी यांनी सांगितले. यात लिटिल टर्न हा पक्षी खासच ठरला. लिटिल टर्न मुख्यत: किनारपट्टीवर आढळतो. वर्षांपूर्वी तो जायकवाडीवर आढळला होता. त्यानंतर पहिल्यांदाच त्याची जोडी पंपिंग स्टेशनकाठच्या पाण्यावर दिसली. नियमितपणे दिसणारा विस्कर टर्न म्हणजेच नदी सुरय किंवा छोटा सुरय या प्रजातीतील हा पक्षी आहे. डोक्यावर टोपीसदृश केस आणि चोचीपासून डोक्यापर्यंत पांढरा पट्टा असणारा लिटिल टर्न लगेच नजरेत भरतो. 

प्रजननाची तयारी 
उन्हाळाअर्ध्यावर आला असला तरी जायकवाडीवर स्थलांतरित पक्ष्यांची लक्षणीय संख्या आहे. हे पक्षी आता प्रजननासाठी तयार आहेत. प्रजननाच्या काळात पक्ष्यांच्या पंखांचे रंग बदलतात. यास ब्रीडिंग प्लमेज असे म्हणतात. एशियन ओपन बिल स्टॉर्क, व्हाइट नेक स्टॉर्क, व्हाइट आयबीस, पर्पल मूर हॅन, जांभळी पाणकोंबडी, कुदन्या यासारख्या अनेक पक्ष्यांची पिल्ले आता दिसत आहेत, तर ग्रेटर फ्लेमिंगो, ब्लॅकटेल्ड गॉडविट, टफटेड डक, गॅरगेनी, ग्लॉसी आयबीस हे स्थलांतरित पक्षीही प्रजननाला तयार झाले आहेत. आपापल्या देशात परतून हे पक्षी पिल्ले देतील. विशेषत: ब्लॅक टेल गॉडविट हा सैबेरियाला जाऊन प्रजनन करण्यासाठी रवाना होत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...