आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी GST नॉलेज सीरीज: कर चुकवेगिरीचे फंडे शाेधू नका, कर भरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीएसटी कार्यशाळेचे उद््घाटन करताना कीर्ती जोशी, सुमेरकुमार काले, अभय शर्मा, उमेश शर्मा, दिव्य मराठीचे सीओओ निशित जैन, राज्य संपादक प्रशांत दीक्षित. - Divya Marathi
जीएसटी कार्यशाळेचे उद््घाटन करताना कीर्ती जोशी, सुमेरकुमार काले, अभय शर्मा, उमेश शर्मा, दिव्य मराठीचे सीओओ निशित जैन, राज्य संपादक प्रशांत दीक्षित.
औरंगाबाद - जीएसटी अर्थात वस्तू व सेवा कर चुकवण्याचे कोणतेही नवे फंडे शोधत असाल तर सावधान. तसे करू नका. कारण  या नव्या करप्रणालीत करचुकवेगिरी करणाऱ्यांना आता बुरे तर प्रामाणिकपणे जीएसटी कायद्याचे पालन करणाऱ्यांना अच्छे दिन येतील, असा मंत्र तज्ज्ञांनी ‘दिव्य मराठी’ नॉलेज सिरीजमध्ये दिला. 
 
‘दिव्य मराठी’च्या वतीने शनिवारी दुपारी ४ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात जीएसटीवर विशेष कार्यशाळा झाली. कार्यक्रमाचे उद््घाटन दीपप्रज्वलनाने झाले. व्यासपीठावर  ‘दिव्य मराठी’चे  सीओओ निशित जैन, राज्य संपादक प्रशांत दीक्षित, पुण्याचे विक्रीकर सहआयुक्त सुमेरकुमार काले, इंदूरचे सीए अभय शर्मा, कीर्ती जोशी आणि औरंगाबादचे सीए उमेश शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दीक्षित यांनी या कार्यक्रमामागची भूमिका विशद केली. या वेळी औरंगाबाद आवृत्तीचे निवासी संपादक दीपक पटवे, नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक जयप्रकाश पवार यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रूपेश कलंत्री यांनी केले. या कार्यक्रमास व्यापारी, उद्योजकांसह सामान्य नागरिक, विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. अभ्यासू विद्यार्थ्यांप्रमाणे अनेकांनी  तज्ज्ञांचे बोल वहीत टिपले व साडेतीन तास बसून जीएसटी म्हणजे नेमके काय हे जाणून घेतले. या कार्यक्रमात सर्वच तज्ज्ञांनी सुरुवातीला जीएसटीवर विषयावर माहिती दिली. त्यानंतर प्रश्नोत्तरे झाली.
 
जीएसटीवरील कार्यशाळेत नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी दिलेली उत्तरे अशी :
 
प्रश्न : साखरेवर किती जीएसटी आहे? ती स्वस्त होणार की महाग?   
उत्तर :
साखरेवर ५ टक्के जीएसटी आहे. दुकानदारांना किमती कमी कराव्याच लागतील. पूर्वी व्हॅट आणि उत्पादन शुल्क असे दोन्ही कर आणि इतर अनेक कर लागत होते. ते कमी झाले आहेत. ते क्रेडिट दुकानदारांनी ग्राहकांना द्यावे.   
 
प्रश्न : मी फ्लॅट विकत घेतला आहे, त्यावर जीएसटी किती लागेल?  
उत्तर :
अचल वस्तूच्या खरेदी-विक्रीवर  १८ टक्के जीएसटी लागेल. पण फ्लॅटच्या बाबतीत  त्यातून ३० टक्के रक्कम जमिनीची किंमत म्हणून वजा होईल. म्हणजे १२ टक्के जीएसटी लागेल. समजा ५० लाखांचा फ्लॅट खरेदी केला असेल तर तो ४७ ते ४८ लाखांत ग्राहकाला पडू शकतो.  
 
प्रश्न : मी फायबरचे दरवाजे तयार करतो, मला आता किती जीएसटी लागेल?  
उत्तर :
पूर्वी तुम्हाला १३.५ टक्के व्हॅट आणि १२.५ टक्के उत्पादन शुल्क लागत होते. तो एकूण कर २६.५ टक्के होता. त्यामुळे आता २८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये तुम्हाला कर लागू शकतो. पण एकदा तुमचा एचएसएन कोड चेक करा. त्यानुसारच कर भरा.   
 
प्रश्न : माझे मेडिकलचे दुकान आहे. माझ्याकडे ३० जूनचा स्टॉक उरलेला आहे. मी नेमका कोणता कर भरू?  
उत्तर
: तुम्हाला जीएसटीच्या कायद्यानुसार कम्पोझिशन योजनेत नोंदणी करावी लागेल. जो कर तुम्ही पूर्वीच्या मालावर भरून त्यावर सूट घेतली आहे ती रक्कम तुम्हाला कर विभागाला परत करावी लागेल. नंतरच जीएसटी भरता येईल.  
 
प्रश्न : मी वितरक आहे, उलाढाल ५ लाखांच्या वर नाही, जीएसटी नंबर घ्यावाच लागेल काय?   
उत्तर :
तुम्हाला जीएसटीच्या नोंदणीची गरजच नाही. पण तुम्ही ज्या कंपनीकडून माल घेता त्यांना क्रेडिट इनपुट पाहिजे असेल तर तुम्ही जीएसटीची नोंदणी करू शकता. कारण कंपनीला तुम्हाला जीएसटीच्या चेनमध्ये ठेवायचे आहे. ्यवहारांची नोंद अपलोड करणे अनिवार्य आहे.
 
प्रश्न : मी मका वितरक आहे. औरंगाबादहून परराज्यात पाठवतो, किती जीएसटी लागेल?   
उत्तर :
तुमचा माल हा करमुक्त गटात येतो. त्यामुळे त्यावर जीएसटी लागणार नाही.  
 
प्रश्न : मी एका कंपनीचे सर्व्हिसिंग सेंटर चालवतो, मला किती जीएसटी  लागेल?  
उत्तर :
हा प्रकार बीटूबी म्हणजे बिझनेस टू बिझनेस या प्रकारात येतो. त्यामुळे कंपनीला इनपुट क्रेडिट घ्यावे लागणार असल्याने तुम्हाला जीएसटी नंबर घ्यावा लागेल. पण तुमची उलाढाल २० लाखांच्या वर गेली तर कर लागेल.  
 
प्रश्न : मी पुस्तक विक्रेता आहे, मला जीएसटी लागेल काय?  
उत्तर :
नाही. तुम्हाला यातून वगळले आहे. पुस्तकावर कर नाही. पण तुम्ही जर प्रिंटिंग करत असाल तर १८ टक्के जीएसटी लागेल.