आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Live Report: Sir, From AC Vehicle How Do You Know Our Problems ?

सायेब, आमच्या व्यथा एसी गाडीतून तुमास्नी कळणार तरी कशा?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनीच विभागीय आयुक्तांना बांधावरून उतरताना असा आधार दिला.
औरंगाबाद - सायेब, गाडीतून बाहेर या, एसी गाडीत बसून तुमास्नी शेतक-यांचे दु:ख कळणार नाही. खाली उतरा, आमच्याशी चर्चा करा. आमच्या व्यथा जाणून घ्या. प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची स्थिती पहा. सततचा दुष्काळामुळे शेतकरी चहुबाजूने कसा अडचणीत आला आहे.... त्याला कुणी योग्य मदत करत नसल्याने तो आत्महत्या करत आहे. याची खरी नोंद घ्या. नुकसान झालेल्या शेतक-यांना योग्य ती भरपाई द्या, ही आर्त विनवणी आहे पाचोडच्या सय्यद महमद इब्राहीम या शेतक-याची.
दुष्काळाची पाहाणी करण्यासाठी केंद्राचे पथक पाचोडला पोहचले तेव्हा आमदार संदीपान भुमरे यांनी स्वागत करण्यासाठी वाहनाचा ताफा थांबवला. यावेळी शेतक-यांनी पथकाच्या वाहनांना गराडा घातला आणि आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फारसा उपयोग झाला नाही. कारण अधिकारी पाच मिनिटे थांबले अन पुन्हा वाहनात बसून पुढच्या गावाकडे निघून गेले.

लिंबगावात पाहणी करून हे पथक पैठण तालुक्यातील मुरामा येथे पोहोचले. मोसंबी, कपाशीची पाहणी केली. तेव्हा गर्दी केलेल्या शेतक-यांच्या चेह-यावर दुष्काळाची छाया स्पष्ट दिसत होती. मोसंबीच्या वाळलेल्या झाडाजवळ पथक येताच रामनाथ लेंभे या शेतक-यांने टाहो फोडला. पाण्याअभावी डोळ्या देखत मोसंबीच्या बागा, तूर, कपाशी आदी पिके करपून गेली, अशी आपबिती रडतरडतच सांगितली. रामनाथचा टाहो आणि वेदना ऐकून वातावरणाचा नूूरच पालटला. सगळेच काहीकाळ स्तब्ध झाले. त्यांना पथकाने धीर दिला.

सांगायचे होते ते राहूनच गेले....
गतवर्षीच्या दुष्काळात माझे १५०० मोसंबीचे झाड जळुन गेली आहेत. ५०० झाडे शिल्लक होती ती यंदा जळू लागली आहेत. केलेला पाच लाखांच्यावर खर्च उत्पादन न झाल्याने भरू शकलो नाही. दहा एकरावर ठिबक सिंचनद्वारे कपाशी लागवड केली. पण एका एकरात दोन क्विंटलपेक्षा कमी उत्पादन निघाले आहे. हे सर्व त्यांना सांगयचे होते. पण त्यांनी एेकून घ्यायला वेळच दिला नाही, अशी तक्रार मुरमा येथील शेतकरी ऋषिनंदन सोनाजी जावळे यांनी केली.

अरे भाई, तूर बोले तो क्या? ‘साब तूर तो पुरी जल गई’, असे रामनाथ लेंभे यांनी सांगितल्यावर ‘अरे भाई, तूर बोले तो क्या’, असा सवाल एका अधिका-याने केला. तेव्हा ‘आपून जो डालफ्राय खाते है, उसमे जो डाल रहती ना वो तूर की होती है’, असे उत्तर गर्दीतील एकाने दिले .