आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Load Shadding In Aurangabad; 7500 Complaint Come

वीस कोटींचा खर्च करूनही औरंगाबादेत वीज गुल; दोन दिवसांत 7500 तक्रारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पाऊस आला तर वीज गुल होऊ नये, यासाठी उन्हाळ्यात मान्सूनपूर्व तयारीच्या नावाखाली लोडशेडिंग झाले. प्रत्यक्षात थोडासा वारा आला, पावसाचे चार-पाच थेंब पडले की वीज गेलीच. फ्यूज कॉल सेंटरला तक्रार केली तर त्याची दखल घेण्यासही कुणी तयार नाही.

या प्रकारामुळे गेल्या चार दिवसांत अनेक भागांत ग्राहकांचे हाल झाले. विशेष म्हणजे ग्राहकांच्या सवरेत्तम सेवेसाठी अशी घोषणा करत दोन वर्षांपूर्वी महावितरणचा कारभार जीटीएलकडे देण्यात आला, तरीही विदारक स्थिती आहे. लोकांकडून जमा होणार्‍या वीज बिलातून जीटीएल दरमहा सुमारे 20 कोटी रुपये कर्मचार्‍यांचे वेतन, वाहन आणि इतर कामांवर खर्च करत आहे.

औरंगाबादेत अजून मान्सून दाखल झालेला नाही. मान्सूनपूर्व पावसानेच जीटीएलच्या दुरुस्ती मोहिमेचे पितळ उघडे केले आहे. दोन जूनला रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर लगेच रेल्वेस्टेशन परिसर, नक्षत्रवाडी, सिडको, हडको, मुकुंदवाडी, छावणी, हर्सूल परिसर अंधारात बुडाला. या भागातली वीज रात्री तीन तास गायब होती. वाळूज, पंढरपूर भागातही आठ तास वीजपुरवठा बंदच होता. त्यामुळे रविवारी 3500 लोकांनी जीटीएलच्या कॉल सेंटरवर तक्रारी केल्या, तर सोमवारी 4000 हजार लोकांनी जीटीलकडे तक्रारी नोंदवल्या.

जीटीएलने एप्रिल महिन्यात मान्सूनपूर्व दुरुस्ती मोहीम हाती घेतली. दोन जूनपर्यंत हे काम पूर्ण केल्याचा दावाही केला. तो फोल ठरल्याचे दिसून येत आहे.


पावसाळ्यात वीज जाण्याची कारणे
*पावसाळी वातावरणात विद्युत वाहिन्यावर कार्बन येतो.
*जोरदार वार्‍यामुळे दोन वाहिन्या (तारा) एकमेकांजवळ येऊन स्पार्क उडतो. वाहिन्या जळतात.
*खांबावर पीन इन्सुलेटर आणि डिक्स इन्सुलेटर चिनी मातीचे बनलेले असतात. पावसाच्या थेंबाने ते एकत्र येतात आणि वीज जाते.
*झाडाची फांदी वाहिनीवर पडल्यानेही वीज जाते.


असे आहे जीटीएलच्या खर्चाचे गणित
वेतन 3 कोटी रुपये
वाहने 5 कोटी रुपये
इतर 12 कोटी
वीज ग्राहक 2 लाख 35 हजार
बिल 90 कोटी
वसूली 62 कोटी सुमारे


चार दिवसांत असे झाले हाल
ठिकाण केव्हा गेली वीज अंधार
रेल्वेस्टेशन, नक्षत्रवाडी रविवारी रात्री 9 वा. 3 तास सिडको, हडको
पंढरपूर, वाळूज रविवारी 4 वा. 8 तास
छावणी, हर्सूल, सिडको, हडको सोमवारी रात्री 9 वा. 3 तास गारखेडा, शिवाजीनगर, मुकुंदवाडी
हडको, छावणी मंगळवारी रात्री 8 वा. 20 मिनिटे
सिडको बुधवारी दुपारी 4 वा. 20 मिनिटे
सारा वैभव, जटवाडा सोमवारी रात्री 10 वा. 24 तास


कोण काय म्हणाले ?
चार महिने अगोदर मान्सूनची तयारी करणे अपेक्षित आहे. मात्र, यंदा जीटीएलने उशिरा सुरुवात केली. वीज गेली तरी जीटीएलचा टोल नंबर लागतच नाही. त्यामुळे तक्रार करता येत नाही. पाऊस आल्यानंतर एखादी तार तुटल्याचे, डीपीजवळ स्पार्किंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास इर्मजन्सी कळवण्यासाठी फोन क्रमांक नाही. हेमंत कपाडिया,सदस्य, विद्युत नियामक आयोग


दुरुस्तीची कामे सुरू
दोन जूनपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात आली. नवीन रोहीत्रासाठी अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 73 डीपींना कुंपण, 24 डीपी ओटे बांधण्यात आले आहेत. 480 ठिकाणच्या तारा दुरुस्त केल्या आहेत. काही ठिकाणी खांबही नवीन लावण्यात आले. तरीही गेल्या चार दिवसात वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटना घडल्या. रविवार, सोमवारी 7500 तक्रारी आल्या. जीटीएलकडे दरमहा सुमारे 5400 तक्रारी येतात. समीर पाठक,जनसंपर्क अधिकारी, जीटीएल