आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणला ग्राहकांचा ठेंगा; 1258 कोटी थकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मोठे उद्योजक वीज बिल थकवतात असे सर्वत्र बोलले जाते. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. विजेचा घरगुती वापर करणार्‍या सामान्य नागरिकांनीही महावितरण कंपनीला ठेंगा दाखवला. औरंगाबाद परिमंडळात वीज बिलापोटी 1258 कोटी 97 लाख 5 हजार रुपये सामान्य ग्राहकांकडे थकले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश ग्रामीण भागात 6 ते 11 तास भारनियमन केले जात आहे.

महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी सातत्याने होते. वीज गुल झाल्यास कार्यालयाची मोडतोड केली जाते. कोकण आणि विदर्भाच्या तुलनेत मराठवाड्यातील जनता बिल भरण्यास धजावत नसल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. औरंगाबाद विभागात 885 फीडर्स असून, यापैकी 30 फीडर्स भारनियमनमुक्त आहेत. 147 फीडर्सवर भारनियमन सुरू आहे. वीज जोडण्या घेतल्यापासून एकदाही बिलाचा भरणा न करणार्‍यांचाही यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील निपाणी पोखरी, सावरगाव आणि मोतीगव्हाण गावांतील ग्राहक शंभर टक्के थकबाकीदार असल्याचा उल्लेख अहवालात आहे. यामुळे प्रामाणिकपणे भरणा करणार्‍या ग्राहकांना याचा फटका बसत असून, त्यांना 6 ते 11 तास भारनियमनाचा त्रास सोसावा लागत आहे.

कंपनीला वीज खरेदीसाठी एक महिन्यापूर्वी जास्तीची रक्कम भरण्याची वेळ आली होती. 1 युनिट विजेसाठी सरासरी 3 रुपये 39 पैसे खर्च येतो. एका ग्राहकाच्या घरापर्यंत वीज नेण्यासाठी 5 रुपये 56 पैसे खर्च येतो.
जून महिन्यात या भागात 1 हजार 9 चोर्‍या पकडण्यात आल्या असून, त्यापैकी 247 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून 50 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
गळतीचे प्रमाण घटले
2011-12 मध्ये 31 टक्के गळती झाली होती. 2012-13 मध्ये 27.39 टक्के गळती झाली आहे.


कोकणाकडे 9 कोटी थकबाकी
कोकणच्या निवासी, उद्योजक, औद्योगिक आणि पाणीपुरवठा ग्राहकांकडे 9 कोटी 64 लाख 19 हजार 688 रुपयांची वीज बिलाची थकबाकी आहे. त्या तुलनेत औरंगाबाद महावितरण परिमंडळात निवासी, उद्योजक, औद्योगिक, कृषी, पाणीपुरवठा ग्राहकांकडे 1258 कोटी 97 लाख 5 हजार रुपये वीज बिलाचे थकले आहेत.

औरंगाबाद परिमंडळात 84 टक्के भारनियमन?
औरंगाबाद परिमंडळात बिल भरण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे 84 टक्के भारनियमन केले जात असल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली आहे. कंपनीचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी मात्र 28 फीडर भारनियमनमुक्त असून 30 टक्के भारनियमन केले जात असल्याचे सांगितले आहे.

थकबाकीचे परिणाम
कंपनीला उत्पन्न मिळत नसल्यामुळे खर्च व उत्पन्नामध्ये तफावत निर्माण होऊन भारनियमन करावे लागत आहे. विजेचा वारेमाप वापर केला जात असल्यामुळे तुटवडा निर्माण होतो. प्रामाणिकपणे भरणा करणार्‍या ग्राहकांना याचा फटका बसत आहे. पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही, विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडतो.

ग्राहकांच्या सहकार्याची गरज

औरंगाबाद परिमंडळातील 885 पैकी केवळ 30 फीडर भारनियमनमुक्त आहेत. प्रत्येक फीडरवर मॉनिटरची नियुक्ती करण्यात आली आहे. वसुलीचे कामही त्यांच्यावर सोपवले आहे. भारनियमनमुक्तीसाठी सर्वांचे सहकार्य हवे.
शंकर शिंदे, मुख्य अभियंता, महावितरण.