आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारनियमनाचा उद्योगांना दररोज 5 कोटींचा फटका, 3 हजार उद्योगांचे दिवाळीचे शेड्यूल बिघडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील वीज तुटवड्याचा थेट फटका यंदा दिवाळीच्या ऑर्डरला हाेण्याची शक्यता आहे. चिकलठाणा, वाळूज आणि शेंद्रा येथे कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने वारंवार ट्रिपिंग होत असल्याने उत्पादनावर त्याचा परिणाम होत आहे. यामुळे ऑनलाइन व्यवहारात उद्योग क्षेत्राला दररोज पाच कोटींचे नुकसान होत आहे. दिवाळीपूर्वी कमिट केलेल्या सुमारे तीनशे कोटींच्या ऑर्डर ठप्प होण्याची भीती उद्योजकांना वाटत आहे. 
 
राज्यात चार हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने लोडशेडिंग सुरू झाले आहे. चिकलठाणा उद्योग वसाहतीला मोठा फटका बसताच शासनाने तातडीने हा भाग वगळण्याची प्रक्रिया हाती घेतली. वाळूजसह शेंद्रा, रेल्वेस्टेशन एमआयडीसी हे भाग यात समाविष्ट नसले तरी वारंवार ट्रिपिंग होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढल्याने उद्योजकांची चिंता वाढली आहे. सर्वाधिक फटका लघु उद्योजकांना बसण्याची शक्यता उद्योजकांनी व्यक्त केली. चारही उद्योग वसाहती मिळून पंधराशेपेक्षा जास्त लघु उद्योग आहेत. त्या सर्वांचे दिवाळीपर्यंतचे शेड्यूल ठरलेले आहे. त्यांना किमान ३०० कोटींच्या ऑर्डर द्यावयाच्या आहेत. एकदा ट्रिपिंग झाले की किमान तीन तासांचा खंड पडत आहे. उद्योगांना दररोज ऑनलाइन व्यवहार करता येत नसल्याने किमान पाच कोटींचा फटका बसत आहे. दरम्यान, याबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधला असता ते नॉट रिचेबल होते. 
 
महाजेनको जबाबदार 
राज्याततीनते चार हजार मेगावॅट विजेचा तुटवडा आहे. त्याला महाजेनको कंपनी जबाबदार आहे. कोळशाच्या तुटवड्यामुळे वीजनिर्मिती कमी होत आहे. लोडशेडिंग आणि ट्रिपिंग या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. 
- प्रसाद कोकीळ, अध्यक्ष सीएमआयए 
 
सरकारने दखल घ्यावी 
औरंगाबाद शहरातील सर्वच उद्योगांना प्रचंड मोठ्या त्रासातून जावे लागत आहे. चिकलठाणा उद्योग वसाहतीला जसा त्रास झाला तसा वाळूजलाही होत आहे. ट्रिपिंगचा त्रास खूप वाढल्याने उत्पादनाचे संपूर्ण टाइमटेबल बिघडण्याची शक्यता आहे. याची दखल सरकारने तत्काळ घ्यावी. 
- सुनील किर्दक, अध्यक्ष मसिआ 
 
शहरातील उद्योजकांना चिंतेने ग्रासले 
यंदा दिवाळी ऑक्टोबर महिन्याच्या १६ पासून सुरू होत आहे. त्यापूर्वी या सर्व ऑर्डर उद्योजकांना द्यावयाच्या आहेत. यात संपूर्ण देशासह विदेशातील ऑर्डरचा समावेश आहे. आठ तासांचे शेड्यूल दिवाळीपूर्वी बारा ते अठरा तासांवर जाते. मात्र हे सर्व टाइमटेबल कोलमडत असल्याने उद्योजकांना प्रचंड चिंतेने ग्रासले आहे. 
बातम्या आणखी आहेत...