आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local Body Election, Congress Yet Not Decided Their Candidate

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: काँग्रेसमध्ये काथ्याकुटानंतरही ठरेना उमेदवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने किशनचंद तनवाणी यांची उमेदवारी जाहीर झाली अन् ते कामालाही लागले. दुसरीकडे उमेदवार कोण यावरून काँग्रेसमध्ये काथ्याकूट सुरू आहे. शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीतून काहीही निर्णय झाला नाही. दरम्यान, बैठक सुरू असताना सर्वच इच्छुक मुंबईत ठाण मांडून होते.

अर्ज भरण्यासाठी 1 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवारीबाबतचे भिजत घोंगडे शेवटच्या क्षणापर्यंत राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे स्थानिक सर्व पदाधिकारी उमेदवारीसाठी इच्छुक असल्यामुळे अधिकृतपणे बोलण्यास कोणीही राजी नाही. प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया, जालन्याचे अब्दुल हाफीज, पालिकेतील प्रमोद राठोड, सय्यद अक्रम, जी. एस. ए. अन्सारी, फेरोज पटेल, जितसिंग करकोटक, दिनेश परदेशी ही मंडळी मुंबईत तळ ठोकून आहेत. अब्दुल सत्तार सुभाष झांबड यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच मापात शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी वजन टाकले आहे.

अशोक चव्हाण हे अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी यांच्यासाठी मांडी घालून बसले आहेत, तर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी प्रमोद राठोड यांच्यासाठी शड्ड ठोकला आहे.

असे आहे बलाबल
0काँग्रेस- 146
0राष्ट्रवादी- 81
0शिवसेना- 94
0भाजप- 51
0लोकभारती- 2
0आमदार बंब आघाडी- 8
0मनसे- 12
0अपक्ष- 32
0भारिप- 2
0रिपाइं- 2
0शहर प्रगती आघाडी- 3
0नगर विकास आघाडी- 11
0बसपा- 1
0स्वीकृत सदस्य- 28
0एकूण- 473

औरंगाबाद जिल्ह्यातील सदस्य- 301
जालना जिल्ह्यातील सदस्य - 172

हे आहेत काँग्रेसचे इच्छुक
प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया, माजी शहराध्यक्ष जी. एस. ए. अन्सारी, फिरोज पटेल, शहराध्यक्ष अँड. सय्यद अक्रम, पैठणचे माजी नगराध्यक्ष जितसिंग करकोटक, अंबडचे बाबूराव कुलकर्णी, वैजापूरचे बाळूलाल संचेती आणि दिनेशसिंग परदेशी, सुभाष झांबड, पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रमोद राठोड, अतिक मोतीवाला, अब्दुल हाफीज.

तीन दिवस ‘वेट अँड वॉच’
पुढील तीन दिवस काँग्रेस उमेदवारासाठी ‘वेट अँड वॉच’ असा आहे. येथे काँग्रेसचे बहुमत आहे आणि काँग्रेसचाच उमेदवारी विजयी व्हायला हवा. मला या मतदारसंघात निवडणुकीचा अनुभव आहे. त्यामुळे खात्रीने सांगतो येथून काँग्रेसचाच विजय होईल. उमेदवार कोण हे र्शेष्ठीच ठरवते. अब्दुल सत्तार, आमदार