औरंगाबाद - डीएमआयसीत धनदांडग्यांनाच प्लाॅट मिळणार, अशी टीका शहरातील उद्योजकांनी करताच सरकारने अनेक अटी शिथिल करत स्थानिकांना सहजतेने प्लाॅट घेता येईल, असे धोरण तयार करण्याची तयारी सुरू केली आहे.
अॅडव्हांटेज महाएक्स्पो या प्रदर्शनात मुख्यमंत्र्यांसमोरच विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शेंद्रा वसाहतीत अनेक प्लाॅट रिक्त आहेत. ते ताब्यात घेऊन गरजूंना देण्यात यावेत तसेच डीएमआयसीतील प्लाॅटचा लिलाव करणे चुकीचे आहे, असे मत व्यक्त केले. त्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी बागडे यांची सूचना गांभीर्याने घ्या, अशा सूचना डीएमआयसी आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी स्थानिक उद्योजक तो कोणताही असो, जादा जागा उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. त्या पार्श्वभूमीवर डीएमआयसीच्या जमिनी आता सर्वांना कशा मिळतील, याचा नवा आराखडा तयार करण्यात येत आहे.
डीपीआरसादर केला तर मिळेल प्लाॅट : डीएमअायसीतीलउच्चस्तरीय अधिकाऱ्याने सांगितले की, पहिला टप्पा ही ट्रायल होती. त्यामुळे लिलाव होऊन धनदांडग्यांनाच प्लाॅट मिळतील असा समज झाला, तो चुकीचा आहे. कारण जे लोक अर्ज करताना डिटेल्ड प्रोजक्ट रिपार्ट सादर करतील त्यातील मेरिट तपासूनच प्लाॅट वाटप होईल. पुढच्या टप्प्यासाठी अशीच योजना राहणार आहे. मात्र, प्लाॅटवर तीन वर्षांत कारखाना बांधला नाही तर जमीन परत घेतली जाणार आहे.
कोणीही करू शकतो अर्ज
सूत्रांनी सांगितले की, डीएमआयसीत उद्योग कुणीही सुरू करू शकतो. त्याला फक्त उद्योग करण्याची इच्छा हवी एवढीच अट आहे. नवउद्योजक तरुणही अर्ज करू शकतात. आॅरिक सिटी डॉट काम या वेबसाइटवर कोणीही यादी पाहू शकतो किंवा अर्ज करू शकतो. फक्त उद्योग कोणता करायचा याचा डिटेल रिपार्ट मात्र अर्जासोबत ऑनलाइन सबमिट केला पाहिजे. तसेच टोकन अमाउंट भरून बुकिंग केले की तुमच्या अर्जाचा नक्कीच विचार होईल.