आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बाण’ मोडून ‘कमळ’ फुलवण्याचा अट्टहास, भाजपच्या बंडखोर उमेदवारांसाठी नेत्यांचीच व्यूहरचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभेत एमआयएमला मिळालेल्या यशाचा धसका घेऊन मनपा निवडणुकीत शिवसेना-भाजपने युती केली. मात्र, दोन्ही पक्षांत बंडखोरांचे पीक आले. दोन्ही पक्षांनी बंडाळी थोपवण्याचे वरवर प्रयत्न केले. मात्र, बंडखोरांना दस्तुरखुद्द नेतृत्वाचेच पाठबळ मिळत असल्यामुळे अधिकृत उमेदवारांचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे. भाजप बंडखोरांना विजयी करण्याची व्यूहरचना केली जात आहे.

शिवसेना उमेदवारांच्या विरोधात भाजपचे जेमतेम पाच ते सहा बंडखोर उभे असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, भाजप उमेदवारांच्या विरोधात सेनेच्या अनेक बंडोबांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे महायुतीसाठी गळ्यात गळे घालून नेतेमंडळी फिरत असली तरी बंडखोरीची लागण झालेल्या वॉर्डांसाठी वेगळ्याच योजना आखल्या जात आहेत. सेनेच्या प्रमुख उमेदवारांच्या विरोधात उभ्या असलेल्या भाजप बंडखोरांवर ‘फोकस’ करून त्यांना निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होत आहेत. एकतानगर वॉर्डातील सेनेचे सुरेश फसाटे यांच्याविरोधात भाजप बंडखोर रंगनाथ राठोड यांना शक्ती दिली जात आहे. राठोड कपाट चिन्हावर निवडणूक लढवत असले तरी त्यांच्या प्रत्येक प्रचार साहित्यावर माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची छायाचित्रे आहेत. महापौर तथा सेनेच्या बाळकृष्णनगर वॉर्डातील उमेदवार कला ओझा यांच्याऐवजी संगीता रत्नपारखे यांच्यासाठी भाजपचे नेते प्रयत्नशील आहेत. पुंडलिकनगर येथील सेनेच्या मीना गायके यांनी प्रचारात आघाडी घेतली असली तरी बंडखोर दामलेंना भाजपची पसंती असल्याचे दिसून आले.

बारवालांना धक्का बसणार?
बेगमपुऱ्यात प्रदीप जैस्वाल समर्थक अनिल भिंगारे धनुष्यबाण चिन्हावर ‘लक’ अाजमावत आहेत. भाजपने त्यांना पाठबळ देण्याऐवजी कैलास पुसे यांना पुढे केल्याची माहिती आहे. माजी महापौर गजानन बारवाल यांचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी पंख कापल्यामुळे त्यांनी बाणाशिवाय विजयश्री खेचण्याची तयारी केली आहे. त्यांना भाजपच्या नेतेमंडळींची पूर्णपणे साथ आहे. त्यामुळे सेनेचे अधिकृत उमेदवार संजय बारवालांना ‘धक्का’ बसण्याची शक्यता आहे.

सेना बंडखोर गळाला लावण्याची तयारी
खडकेश्वर येथील सुगंधकुमार गडवे या शिवसैनिकाला कुणाल खरात आणि अन्य एका उमेदवाराचे आव्हान आहे. नागेश्वरवाडीतील सेना उमेदवार विनायक देशमुख यांच्याविरोधात महेंद्र शिंदे यांनी दंड थोपटलेत. शिंदे निवडून आल्यास ते भाजपच्या गळाला लागण्याची अधिक शक्यता आहे. भारतनगर येथून दिग्विजय शेरखानेंच्या विरोधात भाजपने दोघांना गळ घालून ठेवल्याची माहिती आहे. यात रिपाइंचे कैलास गायकवाड आणि भाजप बंडखोर जालिंदर शेंडगे यांचा समावेश आहे. एकनाथनगरातून सेनेच्या शोभा बालाजी सूर्यवंशी यांना उत्तम अंभोरेंचे आव्हान असून अंभाेरेंना निवडून आणण्याची रणनीती आखली जात आहे.

गुलमंडीत अपक्षांमागे ताकद
संपूर्ण शहराचे लक्ष लागलेल्या गुलमंडी या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला या वेळी ‘खिंडार’ पाडण्याची योजना आखली जात आहे. सेनेचे सचिन खैरे यांना स्वपक्षाचे बंडोबा पप्पू व्यास यांचे तर आव्हान आहेच, त्याशिवाय भाजपचे बंडखोर राजू तनवाणी यांच्याशीदेखील सामना करावा लागणार आहे. त्यामुळे गुलमंडीचा निकाल धक्कादायक लागल्यास आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नसल्याचे जाणकारांनी म्हटले आहे.