आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local Officers Decide Alliance With Sena, BJP Meeting Decision

सेनेशी युतीचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना, भाजपच्या राज्यस्तरीय बैठकीत झाला निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेनेबरोबर युती करायची की नाही, यासाठी आता भाजप पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांकडे डोळे लावून बसावे लागणार नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थिती तपासून तेथेच निर्णय घ्यावा, असा निर्णय भाजपच्या राज्यस्तरीय कोअर कमिटीच्या बैठकीत नाशिक येथे घेण्यात आला.

भाजपच्या दोनदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाला शनिवारपासून नाशिक येथे सुरुवात झाली. कोअर कमिटीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, १४ उपाध्यक्ष, तेवढेच सचिव, सरचिटणीस आणि कोशाध्यक्ष यांच्यात दोन तास चर्चा झाली. अधिवेशनात रविवारी कोणते प्रस्ताव ठेवायचे, त्याला अनुमोदन कोणी द्यायचे, यावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सत्तेतील भागीदार असलेल्या भाजपला शिवसेनेची भीती असल्याचे या बैठकीतील चर्चेतून दिसते. शिवसेना विरोधकासारखी वागते. तेव्हा त्यांच्यासोबत कसे वागायचे, असा प्रश्न एका पदाधिकाऱ्याने उपस्थित केला. त्यावर त्या-त्या ठिकाणी भाजपची ताकद, शिवसेनेचे प्राबल्य या सर्व बाबींचा विचार करून स्थानिक पदाधिकाऱ्यांनीच युती करायची की नाही, याचा निर्णय घ्यावा. हा विषय प्रदेश पातळीवर आणू नये, असे ठरल्याचे समजते. उद्याच्या बैठकीत त्यावर जाहीर चर्चा होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत अनपेक्षितपणे शिवसेना भाजपची युती झाली होती; परंतु सातारा देवळाई या दोन वाॅर्डांसाठी होणाऱ्या निवडणुकीत युती करण्याचा निर्णय दोन्हीही पक्षांनी घेतला. विशेष म्हणजे युतीसाठी दोघांत फारशी चर्चाही झाली नाही.

यापुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असेच काहीसे चित्र दिसण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी औरंगाबाद जिल्हा परिषदेची निवडणूक होणार असून तेथे या दोन मित्रपक्षांत युती होण्याची शक्यता कमीच असल्याचे स्थानिक नेत्यांनी सांगितले. एकूणच या पुढील काळात स्थानिक पातळीवर हे दोन मित्रपक्ष युतीत लढण्याची शक्यता कमीच आहे.