आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोहा नगरपरिषदेत मनसेला बहुमत, राष्ट्रवादीसह भाजप-सेनेचा \'भोपळा\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नांदेड)- नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने जोरदार मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. 17 जागांपैकी 9 जागा जिंकत शहरी तोंडवळा असलेल्या मनसेने काँग्रेस-राष्ट्रवादीला घरच्या मैदानावर चारीमुंड्या चित केले आहे. काँग्रेसने आपली अब्रू राखली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्र पानीपत झाले असून पक्षाला एकही जागा जिंकण्यात यश आले नाही. भाजप-सेना-आरपीआय महायुतीला अपेक्षेप्रमाणे फारसे यश मिळणार नव्हते आणि झाले हे तसेच. मात्र, काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या माजी आमदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांच्यामुळे एनसीपीला येथे मोठे यश अपेक्षित होते. मात्र, पक्षाचे विद्यमान आमदार शंकर धोंडगे यांनी चिखलीकरांना व पक्षांना आव्हान देत काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे राज्यात नंबर एक पक्ष अशी आरोळी ठोकणा-या नेत्यांनी मात्र यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
17 जागापैकी मनसेने 9, काँग्रेसने 8 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या प्रचारात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांनी एकत्र येत लोहात प्रचार केला होता. त्याचा त्यांना किमान अब्रू राखण्यापुरता तरी फायदा झाला आहे. तरीही मनसेने मारलेली निश्चितच कौतुकास्पद आहे. नांदेड परिसरात पक्षाची संघटना मजबूत नसतानाही मनसेने मिळवलेले यश राज ठाकरे यांना सुखावणारे आहे. मात्र मनसेच्या यशाबाबत माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी मेहनत घेतल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेतून मनसेत आलेल्या चव्हाण यांचे यामुळे राजकीय वजन वाढणार आहे.