आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोककलांचा गोडवा कायम: राजस्थानातील ‘मांड’, मध्य प्रदेशातील ‘बघेली’ची मेजवानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पारंपरिक कला भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. राजस्थानातील मांड लोकगीतांचे जतन, संवर्धन आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहोत. आज हजारो वर्षांनंतरही त्यातील गोडवा कमी झालेला नाही, असे मत राजस्थानातील ‘माड’ या गायन प्रकारातील एकमेव कलाकार गोवरीदेवी यांनी व्यक्त केले.

87 वर्षांच्या गोवरीदेवी आपली पाच मुले आणि सुनांच्या साथीने आजही मांड गायन पद्धतीचे जतन करीत आहेत. 90 वर्षीय पती मिर्शीलालजीचीही त्यांना साथ आहे. त्या राजस्थान आकाशवाणीच्या ‘अ’ दर्जाच्या कलावंत आहेत. मांड हे भैरवीच्या साथीने गायले जाणारे लोकगीत आहे.

गोवरीदेवी म्हणाल्या, उदयपूर, जोधपूर आणि जैसलमेरच्या राजदरबारांमध्ये त्यांचे आईवडील रजवाडी पद्धतीचे गायन करायचे. माड पद्धतीचे गायन राजासमोर केले जात असल्याने याला राजवाडी असेही म्हणतात. यातील गीतांची बांधणी भैरवी रागात करण्यात येते. उत्सव आणि विशेष प्रसंगी हे गायन हल्ली केले जात असले तरी याचे प्रमाण कमी झाले आहे. राजस्थानात अनेक घराणी राजवाडी गायन करतात. मात्र, त्यांनी पारंपरिक प्रकाराला आधुनिक टच दिल्याने त्यात आता अस्सलपणा उरला नाही. हा गायनप्रकार अत्यंत ताकदीचा असल्याने यासाठी साधनाही तेवढीच करावी लागते.

त्यांच्या गायनाचे कार्यक्रम दिल्ली, लखनऊ, रोहतक, राजकोट, जैसलमेर अशा विविध रेडिओ केंद्रासह दूरदर्शनवरही होतात. संपूर्ण घर याच कलेच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख टिकवून आहे. या वयातही पहाडी आवाज आणि दमदारपणा त्यांच्या बोलण्यातून, गायनातून दिसून येतो. हिंदी भाषाही त्यांना फारशी येत नाही असे असले तरी वयाच्या 11 व्या वर्षांपासून सातत्यपूर्णरीत्या त्यांनी माड गायनशैलीची जोपासना केली असून आजपर्यंत हा अमूल्य ठेवा टिकवून ठेवण्याचे मोठे श्रेय त्यांना आहे.

मध्य प्रदेशातील बिंध्य प्रांतात उदयास आलेली ‘बघेली’ ही अतिप्राचीन लोककला आहे. यात नृत्य आणि गायन या दोन्ही माध्यमातून भगवंताची स्तुती केली जाते. दैनंदिन जीवनातील अनेक नटखट प्रसंगाचे वर्णनही यातून केले जाते. या प्रकारात नवनवे संदर्भ येत असल्याने आमची लोककला या पिढीतही लोकप्रिय आहे, असे मणिमाला सिंह यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, गेल्या 25 वर्षांपासून मी या कलेची साधना करत आहे. माझ्या वडिलांचे घराणे हे औरंगजेबांच्या दरबारी सैन्यात होते. त्यामुळे माहेरी कलेचा गंधही नव्हता. मला सासरच्यांनी गाणे शिकवले.
हिंदू धर्मात राम हा देवाचा सर्वाधिक पुजनीय अवतार मानला जातो. रामावर आधारित अनेक रचना आम्ही सादर करतो. रामजीवनाचे वास्तव मांडताना जीवन कसे जगायला हवे, भगवान रामाने दिलेला संदेश आजच्या काळातही कशा पद्धतीने लागू होतो याबाबत वर्णन केले जाते. याशिवाय महिअर माता आणि गंगामातेची महतीही यातून सांगितली जाते. अत्यंत लोकप्रिय असा हा कलाप्रकार आहे. विविध महाविद्यालयांमध्ये होणार्‍या वार्षिक स्नेहसंमेलन तसेच शहरात होणार्‍या विविध सांस्कृतिक उत्सवात या कार्यक्रमाचा समावेश आवर्जून केला जातो. यामुळे नव्या पिढीपर्यंत पोहोचलेली ही कला सादर करून याचा ईश्वरीय अनुभव घेण्यासाठी नवे कलावंत नेहमीच उत्सुक असतात, असे त्यांनी सांगितले.

>‘बघेली’चे सादरीकरण करणार्‍या मणिमाला सिंह यांचा दावा

>बघेली लोकसंगीत नव्या पिढीतही लोकप्रिय करतोय

पारंपरिक कलांना मरण नाही
आकाशवाणी केंद्राच्या वतीने जागतिक रेडिओ दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत दुसर्‍या दिवशी बुधवारी (13 फेब्रुवारी) प्रांतीय लोककलांवंताना आमंत्रित करण्यात आले आहे. राजस्थानातील ‘मांड’ या गायनशैलीच्या प्रकाराबरोबरच मध्य प्रदेशात लोकप्रिय ‘बघेली’ या लोकसंगीताचा आणि महाराष्ट्रातील भारुडांचा यात समावेश आहे. ‘दिव्य मराठी’ने या कला आणि कलाकारांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.