आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारी अर्जासाठी पाच एप्रिलची डेडलाइन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून 5 एप्रिल 2014 ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निवडणुकांची अधिसूचना 29 मार्चला निघणार आहे. त्या दिवशीपासून उमेदवारी अर्ज करण्यास सुरुवात होईल. निवडणूक प्रक्रिया 28 मे 2014 पर्यंत असेल. आदर्श आचारसंहिताही तेव्हाच संपणार आहे. यंदा आचारसंहितेत काही बदल करण्यात आले आहेत. आचारसंहितेचा भंग करण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींकडून शस्त्रे जमा करण्यात येतील. मतदान यादी व भाग क्रमांक बघायचा असेल त्यांच्यासाठी 9869889966 हा टोल फ्री नंबर असून त्यावर केवळ ईटीआयसी टाइप करून आपला ओळखपत्र नंबर टाकून संदेश पाठवायचा आहे. नऊ मार्चला सर्व मतदान केंद्रांवर मतदार यादीतील नावे पाहता येतील. नवीन नोंदणी करण्यासाठी येथे अर्जही उपलब्ध करण्यात येईल. उमेदवारांसह कार्यकर्त्यांनाही तक्रार व सूचना मांडता येईल. आचारसंहितेदरम्यान उमेदवार घरातून निघाल्यापासून त्यांच्यावर पाळत असणार आहे. वाहनांची तपासणी करण्यासाठी वेगळे पथक असून काही गैरप्रकार झाल्यास कारवाई करणार असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले. सोशल साइटवर आक्षेपार्ह मजकूर, चित्र, संदेश आढळल्यास संबंधितांवर कारवाई होईल, असेही ते म्हणाले. उमेदवारांनी निवडणुकीच्या खर्चासाठी नवीन खाते उघडण्याची सूचना विक्रम कुमार यांनी केली. सार्वजनिक ठिकाणी व लग्नसमारंभात कार्यकर्त्यांसह उमेदवाराने दोन-तीन दिवस हजेरी लावल्यास येथे होणारा खर्च उमेदवारांकडे लागणार आहे.
निवडणुकांसाठी पोलिसांची 48 पथके असल्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी सांगितले. या वेळी अपर जिल्हाधिकारी किशनराव लवांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हतगळ, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, लेखाधिकारी डॉ. विलास जाधव आदींची उपस्थिती होती. दरम्यान, आचारसंहिता लागल्याने जिल्हा परिषद अध्यक्षा शारदा जारवाल, उपाध्यक्षा उज्ज्वला निकम, महिला व बाल कल्याण समिती सभापती पूनम राजपूत, बांधकाम व अर्थ समिती सभापती डॉ. सुनील शिंदे, शिक्षण व आरोग्यमंत्री बबन कुंडारे, समाजकल्याण सभापती रामनाथ चोरमले यांना दिलेली शासकीय वाहने जमा करण्यात आली.
सभेचा खर्च ग्राह्य धरणार
आचारसंहिता लागल्यानंतर राहुल गांधींची सभा झाली. याचे शूटिंग पोलिस आणि जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सभेसाठी किती बसेस आल्या, लोकांची उपस्थिती, बॅनर व इतर खर्च पक्षाला निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार आहे.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
29 मार्च : अधिसूचना जाहीर व अर्ज भरण्यास सुरुवात
5 एप्रिल : अर्ज भरण्याची शेवटची तारीख
7 एप्रिल : अर्जाची छाननी
9 एप्रिल : अर्ज परत घेण्याची तारीख
24 एप्रिल : मतदान
16 मे : मतमोजणी