आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election, Latest News In Divya Marathi

माजी आमदार, खासदारातून एकाच्या गळ्यात पडेल उमेदवारीची माळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता दिवसेंदिवस ताणली जात असली तरी आता चर्चेतील नावाची यादी खूपच लहान झाल्याचे गुरुवारी शहरात झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या बैठकीत स्पष्ट झाले. शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा आणि डॉ. कल्याण काळे हे दोघे विद्यमान आमदार स्पर्धेतून बाहेर पडले असून आता उत्तमसिंह पवार आणि नितीन पाटील या माजी खासदार-आमदारातून एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार हे जवळपास नक्की झाले आहे.
गुरुवारी शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या औरंगाबाद व जालना लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. या वेळी काँग्रेसचा उमेदवार जाहीर होईल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. प्रदेशाध्यक्ष घोषणा करतील, असे काहीजण बोलतही होते. त्यांनी काहीच भाष्य न केल्याने आता मुख्यमंत्री घोषणा करणारच, अशी अनेकांची धारणा झाली होती, परंतु त्यांनीही भाष्य करण्याचे टाळले. त्यामुळे कार्यकर्त्यांतून थेट मागणी झाल्याने येत्या 1-2 दिवसांत आपला उमेदवार निश्चित होईल, असे उत्तर त्यांना द्यावे लागले. त्यानंतरही कार्यकर्त्यांतून घोषणाबाजी होत असल्यामुळे उमेदवार व्यासपीठावरच आहे, असे त्यांनी जाहीर केले. त्या वेळी व्यासपीठावर डॉ. कल्याण काळे नव्हते. घरातील लग्न समारंभ असल्यामुळे ते आले नव्हते. मी लढणार नाहीच, असे दर्डा यांनी पूर्वीही जाहीर केले आणि लगेचच पत्रकारांना पुन्हा सांगितले. त्यामुळे व्यासपीठावर राहिलेल्या पवार-पाटील यांच्यातून कोण एवढाच प्रश्न शिल्लक होता. त्यातच सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी ऐनवेळी आभार व्यक्त करण्याची संधी नितीन पाटील यांना दिली आणि अरे ! उमेदवार तर ठरला मग सांगत का नाही, अशा प्रतिक्रिया उमटल्या.
नावाच्या चिंधड्या होतात तेव्हा
बैठकीला सर्वच परिचित मंडळी होती. अनोळखी किंवा पहिल्यांदाच पक्षात आलेला कार्यकर्ता असेल तर नावात गल्लत होते. परंतु काल अनेकांच्या नावाच्या चिंधड्या झाल्या. मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख पृथ्वीराज पवार असा करण्यात आला, भोकरदनचे आमदार चंद्रकांत दानवे यांनी भाजपचेच सिल्लोडचे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांच्या नावाचा उल्लेख सांडूभाई असा केला. माणिकराव ठाकरेंचा उल्लेख माणिकराव गावित असा करण्यात आला.
स्थानिक नेत्यांकडून सुरूंग
राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसची मरगळ झटकण्यासाठी जोमाने प्रयत्न केल्याचे सर्वर्शुत आहे. जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये भलत्याच भानगडी चालतात. मला याचा चांगला अनुभव आहे. ते बोलतात एक नंतर बाहेर जाऊन करतात दुसरेच. त्यामुळे आपलेच उमेदवार पडतात. अधिक भाष्य त्यांनी केले नाही. 2010 मध्ये मनपा निवडणुकीत विखे यांनी सत्तेसाठी प्रयत्न केले होते. परंतु काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या इच्छेला सुरुंग लावला.
मताधिक्य देण्याची स्पर्धा
या बैठकीला दोन्ही जिल्ह्यांतील अध्यक्षांनी आपल्या जिल्ह्यातून उमेदवाराला मताधिक्य दिले जाईल, अशी सुरुवात केली आणि नंतरच्या प्रत्येक आमदाराने माझ्या मतदारसंघातून किमान 15 ते 25 हजारांचे मताधिक्य राहील, असे छातीठोक दावे केले. त्यामुळे दोन्हीही मतदारसंघांतील उमेदवार किमान दोन ते अडीच लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील.
राष्ट्रवादीचा दावा कायमच
काँग्रेसचा उमेदवार ठरत नसेल तर खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी लगेच चर्चा करा आम्ही लढतो, असा थेट दावा प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री तसेच अन्य नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला. काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून सुरू असलेल्या गोंधळामुळे अजूनही राष्ट्रवादीला हा मतदारसंघ मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी केली.