आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election, Latest News In Divya Marathi

मुस्लिम, दलित मतदार लिहिणार नितीन पाटील, चंद्रकांत खैरेंचे भाग्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे नितीन पाटील यांच्यातच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात खरी लढत आहे. या मतदारसंघात चार लाखांच्या आसपास मुस्लिम मते असून मोदी फॅक्टरमुळे ही मते एकगठ्ठा काँग्रेसकडे गेली तर खैरेंना चौथ्यांदा लोकसभेत जाणे काहीसे अवघड होणार आहे. मुस्लिम आणि दलित मतदारच पाटील आणि खैरेंचे भाग्य लिहिणार असे सध्याचे चित्र आहे.
गेल्या 20 वर्षांपासून औरंगाबाद मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी प्रत्यक्षात काँग्रेसच्या परंपरागत मतांच्या विभाजनामुळेच येथून शिवसेना विजयी झाली आहे. 1998 ला प्रदीप जैस्वाल पराभूत झाले तेव्हाच सेनेची भगवी लाट संपल्याचे स्पष्ट झाले होते. नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या मतांचे विभाजन होत राहिले आहे. गेल्या निवडणुकीतही वेरूळ मठाचे शांतीगिरी महाराज यांनी दीड लाख मते घेऊन खैरेंचा विजय सोपा केला होता. यावेळी मात्र तशी स्थिती नाही.
यंदा तेवढी मते घेणारा उमेदवार रिंगणात नाही. आपचे उमेदवार सुभाष लोमटे किती मते घेतात, यावर बरेच काही अवलंबून आहे. जुने कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या लोमटेंना आपची उमेदवारी मिळाली असली तरी नवी पिढी त्यांना कितपत जवळ करते, यात शंका आहे. तरीही लोमटेंच्या झाडूकडे जाणारी मते ही काँग्रेसचीच जास्त असतील, असा अंदाज आहे. सदाशिव गायके यांनी काँग्रेसला रामराम ठोकत समाजवादी पक्षाची सायकल सोबत घेऊन मैदानात उडी घेतली. त्यांना मुस्लिम तसेच मराठा मते मिळतील, असा कयास आहे. फिरोज खान हे वेल्फेअर पक्षाकडून रिंगणात आहे. हे तिन्ही उमेदवार काँग्रेसची किती मते पळवतात, यावर या मतदारसंघाचे भवितव्य अवलंबून आहे.येथे 16 लाख मतदार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टक्केवारी वाढणार हे उघड आहे. त्यामुळे 10 लाखांवर मतदान होण्याची शक्यता असून जास्तीचे मतदान कोणाच्या पथ्यावर पडते याचा अंदाज लावणे अवघड आहे.