आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Collector Vikram Kumar, Divya Marathi

‘हवे’तून येणार्‍या पैशांवर प्रशासनाची राहणार नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - निवडणुकीच्या काळात विमानाने येणारे प्रवासी तसेच ऐनवेळी दाखल झालेल्या विशेष हेलिकॉप्टरमधून काय आले, याचीही तपासणी होणार आहे. खासगी हेलिकॉप्टरवर आयोगाची खास नजर असणार आहे. जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांच्या दालनात पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह, पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 50 हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम आढळली तर त्याची कागदपत्रे सोबत ठेवावी लागतील, अन्यथा वाहनासह रोख जप्त होईल.


पाच व्यक्ती अन् तीनच वाहने
शनिवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारासोबत अन्य चारच व्यक्ती जाऊ शकतील. सहाव्या व्यक्तीला जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात उमेदवारी अर्ज देताना प्रवेश असणार नाही. उमेदवार फक्त तीनच वाहनांतून येतील, चौथे वाहन चालणार नाही. वाहन रॅलीत दहा वाहनांचा समावेश असेल. मोटारसायकल तसेच सायकललाही वाहनांचा दर्जा असल्यामुळे 10 कार, 10 मोटारसायकल असे चालणार नाही, एकूण संख्या 10 ठेवावी लागणार आहे. प्रत्येक रॅलीसाठी परवानगी घ्यावी लागेल. जाहीर सभेसाठी 48 तास आधी परवानगी घेणे बंधनकारक आहे. प्रचारासाठी रात्री 10 वाजेपर्यंतची वेळ असेल. त्यानंतर कोणालाही प्रचार करता येणार नाही. बंद सभागृहात बैठक मात्र घेता येईल.


प्रचार कार्यालय अधिकृत जागेवर
उमेदवाराला प्रचार कार्यालय सुरू करायचे असेल तर पोलिस, पालिका किंवा नगर परिषदेची परवानगी घ्यावी लागेल. अधिकृतपणे बांधलेल्या इमारतीमध्येच कार्यालयाला परवानगी दिली जाईल. अनधिकृत इमारतीत प्रचार कार्यालय सुरू करता येणार नाही. उमेदवाराला दोन दिवसांनी निवडणूक खर्च देणे बंधनकारक आहे. चहापासून ते मंडप, खुर्चीपर्यंत वस्तूंचे दर निश्चित केले आहेत. या किमान दरापेक्षा कमी दराने खर्च सादर करता येणार नाही. अन्यथा आयोग ठरावीक दरानुसार खर्च गृहीत धरील.


शपथपत्र सर्वत्र
मालमत्तेचे विवरण असलेले उमेदवाराचे शपथपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असले तरी गावोगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयातही त्याच्या प्रती चिकटवण्यात येणार आहेत. उमेदवाराकडे किती मालमत्ता आहे, हे सर्व मतदारांना समजावे हा त्यामागील उद्देश आहे.


तक्रारीसाठी हेल्पलाइन सुरू
आचारसंहितेचा भंग होत असेल, कोणी पैशांचे वाटप करत असेल किंवा अन्य काही मार्गाने आमिष दाखवत असेल तर सर्वसामान्यांना तक्रार करता यावी यासाठी आयोगाने हेल्पलाइन सुरू केली आहे. 18002339234 असा हा क्रमांक असून तो नि:शुल्क आहे. त्यावरील संभाषण रेकॉर्ड केले जाणार असून तक्रारकर्त्याचे नाव मात्र गुप्त ठेवले जाणार आहे. पोलिसांची हेल्पलाइनही लवकरच कार्यान्वित होणार आहे.