आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Divya Marathi, Black Money, Aurangabad

व्यापारी, उद्योजकांच्या व्यवहारावर नजर;निवडणूक आयोगाच्या उपाययोजनांची झळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - निवडणुकीत पैशांच्या गैरव्यवहारावर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या कठोर उपाययोजनांची झळ उमेदवार, नेते आणि कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर सामान्यांनाही बसत आहे. व्यापारी आणि उद्योजकांनी स्वत:च्या व्यवहारासाठी काढलेल्या रकमेवरही पोलिसांची नजर आहे. त्यामुळे रोकड बाळगायची असेल तर सोबत हिशेबाच्या चिठ्ठय़ा ठेवाव्यात, अन्यथा चेकद्वारे व्यवहार करावेत.
यंदाच्या निवडणुकीत आयोगाचे बारकाईने लक्ष आहे. निवडणुकीच्या काळात काळा पैसा बाहेर काढला जातो. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम कुमार आणि पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी रोकड पकडण्याची जोरदार मोहीम हाती घेतली आहे. सिल्लोड येथील रोकड निवडणुकीसाठीच आल्याचे सिद्ध झाले आहे. तथापि, सिंह यांनीही शहरात विविध ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू असल्यामुळे त्याचा फटका उद्योजक आणि व्यापार्‍यांनाही बसत आहे. रोकड बाळगणार्‍यांना पैशांचे विवरण, पावती, कोणाकडून आणली, कोणाला देणार याबाबतची माहिती सोबत ठेवणे आवश्यक आहे. भरारी पथकांकडून तपासणी झाल्यास त्यांना त्या पैशासंबंधी आवश्यक ती माहिती दिली तरच पुढील त्रास वाचणार आहे. जिल्ह्यात 145 भरारी पथकांकडून तपासणी केली जात आहे.
या गोष्टींची घ्या काळजी
0 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम सोबत बाळगताना ती कोणाकडून घेतली त्याचे पुरावे ठेवा
0 पैसे काढल्याची एटीएमची पावती सोबत ठेवा
0 रक्कम कोणासाठी घेऊन जात आहे त्याचे ठोस कारण पथकाला पटवून देता आले पाहिजे
0 खिशातील रक्कम, सोने यांच्या हिशेबाचे पुरावे, विनियोग कसा करणार याची समाधान करू शकणारी कागदपत्रे सोबत बाळगावी प्राप्तिकर विभागाकडून जकात नाके, रेल्वेस्थानके, विमानतळ आदींवर नजर आहे
चेकचे व्यवहार फायद्याचे
कटकटीच्या व्यवहारांपासून वाचण्यासाठी चेकद्वारे केलेले व्यवहार अधिक सुरक्षित आहेत. कारण अशा व्यवहारांचे रेकॉर्ड उपलब्ध राहत असल्याने पैसे कोठे गेले याची माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे निवडणूक काळात चेकचे व्यवहार अधिक सुरक्षित असून आदर्श आचारसंहितेचे पालन करणेही सोपे होईल.