आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Election Commission Of India, Aurangabad

मतदान टाळणार्‍यांचा खाडा लावणार,निवडणूक आयोगाचे शासकीय कार्यालयांना पत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांनी मतदानाचा दिवस हॉलिडे म्हणून साजरा करण्याऐवजी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे. मतदान न करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांचा खाडा लावला जाणार आहे. म्हणजेच या दिवसाचा पगार दिला जाणार नाही, अशा आशयाचे पत्र सर्व शासकीय कार्यालये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला देण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शासकीय अधिकारी-कर्मचारी मतदानाचा दिवस कुटुंबासह घालवण्यासाठी नियोजन करतात. बहुतेक जण परगावी जाण्याचा बेतही आखतात असा दरवेळीचा अनुभव असल्याने यंदा मात्र आयोगाने सर्व शासकीय कर्मचार्‍यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यात पोस्टर, वर्तमानपत्र, टीव्हीतून जाहिरात अशा विविध माध्यमांतून जनजागृती केली जात आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांना आवाहन करून मतदान करण्यास भाग पाडणे हादेखील त्याचाच एक भाग आहे. आयोगाच्या आवाहनानंतरही जे अधिकारी अथवा कर्मचारी मतदान न करता हॉलिडे साजरा करतील त्यांचा एक दिवसाचा खाडा लावला जाणार आहे. तसेच शासकीय कर्मचार्‍यांनी कोणत्याही निवडणूक प्रचारात सहभागी होऊ नये, असेही आवाहन पत्राच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे.
सक्ती केली नाही
अधिकारी-कर्मचार्‍यांना मतदानाची सक्ती करता येत नाही. पण शासनाच्या आर्थिक सुविधांचा लाभ घेऊन मतदानाच्या दिवशी सुटी करण्याऐवजी मतदानाचा हक्क बजावावा. - शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी