आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानाने लोकसभा उमेदवार निवडीचा संभ्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-देशातील 15 मतदारसंघांत कार्यकर्त्यांचे मतदान घेऊन नंतरच काँग्रेसचा लोकसभेचा उमेदवार ठरवला जाणार आहे. त्यात औरंगाबादचा समावेश असल्याच्या बातम्या सातत्याने प्रसिद्ध होत असल्या, तरी जिल्हा काँग्रेसला हायकमांडकडून कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे पक्षाचा हा महत्त्वाचा निर्णय अजून तरी वृत्तपत्रीय बातम्यांपुरताच र्मयादित आहे. राहुल गांधी यांनी यासाठी पुढाकार घेतला असल्याने प्रक्रिया नेमकी कशी असेल, याची कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
देशातील 15 लोकसभा मतदारसंघांत राज्यातील औरंगाबादपाठोपाठ यवतमाळ या मतदारसंघाचा समावेश असल्याचे जाहीर झाले असले तरी नेमकी निवडणूक प्रक्रिया कशी असणार, कोणते कार्यकर्ते यासाठी मतदान करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम्ही र्शेष्ठींकडून सूचनांच्या प्रतीक्षेत असल्याचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी स्पष्ट केले आहे. तालुकाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, वॉर्डाध्यक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थांतील विद्यमान लोकप्रतिनिधी ही मंडळी मतदान करतील, असे खासगीत सांगण्यात येते. प्राथमिक सदस्य असलेल्यांनाही उमेदवार निवडीचा अधिकार असावा, अशी काहींची मागणी असली तरी र्शेष्ठींकडून काय सूचना येतात, त्यावर सर्व काही अवलंबून आहे.
पक्षाकडून अधिकृत सूचना नाही
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार निवडणुकीद्वारे ठरणार असल्याचे आम्ही वृत्तपत्रांतूनच वाचतो. पक्षाकडून आम्हाला कोणतीही सूचना मिळाली नाही. ही प्रक्रिया नेमकी कशी असेल, हे मी सांगू शकत नाही. सूचना मिळाल्यानंतर ही प्रक्रिया राबवली जाईल. केशवराव औताडे, जिल्हाध्यक्ष
कार्यकर्त्यांचा रोष
काँग्रेसचा उमेदवार वरिष्ठ पातळीवर ठरवला जातो. कोणता उमेदवार असावा यासाठी कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे अधिकृत उमेदवाराचा आम्ही प्रचार का करावा, असा थेट सवाल कार्यकर्ते करतात. त्याचा फटका शेवटी पक्षालाच बसतो. यापुढे अशी नाराजी येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.