आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दानवे म्हणाले- आगामी लोकसभा स्वबळावर लढणार; शिवसेनेबरोबर युती होणार नाहीच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती होणार नाहीच, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी औरंगाबादेत बोलताना स्पष्ट केले. भाजप स्वबळावर लढेल, व्यासपीठावर बसलेल्यांपैकी कोणीही लोकसभेचा उमेदवार असू शकतो, असे संकेत देत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या. 


लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भाजपच्या विभागीय बैठकांना औरंगाबाद येथून सुरुवात झाली. व्यासपीठावर लोकसभेसाठी इच्छुक असलेले प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, आमदार अतुल सावे प्रशांत बंब, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी आदी उपस्थित होते. मराठवाड्यातील जिल्ह्यांची ही बैठक होती. या वेळी मंडळ अध्यक्षांपासून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी आगामी लोकसभा निवडणूक ही भाजप स्वबळावरच लढणार, असे सांगितले. 


युती झाल्यापासून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे येथे भाजपकडे उमेदवार नसल्याची चर्चा वारंवार होत असते. मात्र पक्षाची जोरदार तयारी आहे, उमेदवारांची कमी नाही, पक्षाकडे खूप कार्यकर्ते आहेत. व्यासपीठावर बसलेल्यांपैकी कोणीही उमेदवार होऊ शकतो. पक्षाला याची चिंता नसल्याचे ते म्हणाले. २४ लाख शेतकऱ्यांना या आठवड्यात कर्जमुक्तीचा लाभ मिळेल, असा दावा दानवे यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर असून कापूस उत्पादकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कालच चर्चा झाली. ज्या कंपन्यांमुळे नुकसान झाले, त्यांना दंड ठोठावून ती रक्कम शेतकऱ्यांना देता येईल का यावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 


भाजपच्या विस्तारकांना मिळणार दुचाकी
भाजपतर्फेजिल्हा शहराध्यक्षांना एक वर्षापूर्वी स्कॉर्पिओ देण्यात आल्यानंतर आता पक्षाच्या विस्तारकांना दुचाकी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांतच या दुचाकी वितरित केल्या जातील. पक्षाने प्रत्येक मतदारसंघासाठी प्रत्येकी एक विस्तारक नियुक्त केला आहे. त्याला मतदारसंघात फिरण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये त्यासाठी हा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहरात तीन विस्तारक असून त्यांना लवकरच दुचाकी दिल्या जातील. 


खोतकर प्रकरणावर भाष्य नाही 
युतीझाल्यास शिवसेनेचे अर्जुन खोतकर लोकसभेकडून प्रतिस्पर्धी असू शकतात. त्यांची आमदारकी उच्च न्यायालयाने रद्द ठरवली. याबाबत विचारले असता भाष्य करण्यास दानवे यांनी नकार दिला. न्यायालयाने निकाल दिला आहे, त्यावर मी काहीही बोलणार नाही, असे सांगून त्यांनी विषय संपवला. 


5 कोटींवरही ‘नो कॉमेंट’ 
दानवे यांचे जावई आणि कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्षात येण्यासाठी 5 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा केला होता. त्यावरही दानवे यांनी भाष्य करण्याचे टाळले. 

बातम्या आणखी आहेत...