आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Loksabha Election News In Marathi, Congress And BJP Preparing Fir Loksabha Election, Divya Marathi

सिल्लोडला कॉँग्रेस-भाजपकडून निवडणुकीची मोर्चेबांधणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे. कॉँग्रेसने विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू केला, तर भाजपने सरदार वल्लभभाई पटेलांचा एकता व अखंडतेचा संदेश देण्यासाठी गावागावांत जाऊन सभांची रणधुमाळी उडवून दिली आहे.
जालना लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून येण्यासाठी खासदार रावसाहेब दानवे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मागच्या निवडणुकीत फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार कल्याण काळे यांच्या मतदारसंघात 13 हजार 618 मतांची आघाडी घेऊन दानवे यांनी विजय मिळवला होता. यंदाही कॉँग्रेसकडून डॉ. कल्याण काळे यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा आहे. परंतु गेल्या निवडणुकीत सिल्लोड विधानसभा मदारसंघातून दानवे 1 हजार 868 मतांनी पिछाडीवर होते. या बाबीवर लक्ष केंद्रित करून त्यांनी अन्य तालुक्यांबरोबर सिल्लोडकडे अधिक लक्ष देऊन हा मतदारसंघ बांधला आहे. आपले स्वतंत्र अस्तित्व व मतांची ताकद असणारे भाजपचे कार्यकर्ते या तालुक्यात आहेत. त्यांच्याकडे असलेल्या या ताकदीमुळे त्यांची महत्त्वाकांक्षाही अधिक असल्याने गटबाजी वाढली होती. हे सूत्र लक्षात घेऊन दानवे यांनी या सगळ्यांना मोठय़ा खुबीने एकत्र केले आहे.
प्रत्येकाच्या काही प्रमाणात का होईना अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी कायम संपर्क ठेवल्याने मागची तूट भरून अधिक मतदान मिळण्याची शक्यता आहे. सध्या स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासाठी लोहसंकलनाचा कार्यक्रम सुरू असून यानिमित्ताने कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन जनतेशी संपर्क साधत आहेत. गावातील समस्या जाणून कॉँग्रेसवर टीका करण्याची संधीही साधत आहेत. बर्‍याच ठिकाणी विकासकामांची उद्घाटने करून पक्ष लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
याच काळात आमदार अब्दुल सत्तार यांनी विकासकामांच्या भूमिपूजनाचा धडाका सुरू केला आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय रस्ते, पूल व सिचनांच्या कामांची भूमिपूजन सुरू आहेत. अंधारी, भवन, घाटनांद्रा व भराडी गटांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले.
अधिकारी, पदाधिकार्‍यांचा ताफा ढोल-ताशे अशा वातावरणामुळे कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे. मतदार संघातील विकासकामांमुळे जनता कॉँग्रेसच्या पाठीशी असल्याचा आमदार सत्तार यांचा दावा आहे. विकासाची दिशा नसल्याने भाजप जातिवादी असून जाती धर्माचा वापर राजकारणासाठी करत असल्याची टीकाही ते भाषणांमधून करतात. आमदार सत्तार यांच्याकडे तालुक्यातील कॉँग्रेसची एकहाती सूत्रे असल्याने सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघासाठी कॉँग्रेसच्या लोकसभा उमेदवाराला सत्तार यांची अनुकूलता असली की त्याला या मतदारसंघासाठी फारसे कष्ट घेण्याची गरज पडत नाही. भाजप व कॉँग्रेस दोन्ही पक्षांच्या संपर्क अभियानामुळे तालुका ढवळून निघाला असून लोकसभेबरोबर दोन्ही पक्षांची विधानसभेचीही तयारी सुरू असल्याने गेल्या पंधरवड्यापासूनच तालुक्यात लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्याचे वातावरण आहे.